अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स, चंद्रपूरची नवी कार्यकारिणी गठीत
शपथविधी सोहळा उत्साहात

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :_ बालरोग तज्ञांची संघटना असलेल्या अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स, चंद्रपूरची 2026 ते 2028 या कालावधीसाठी नवी कार्यकारिणी गठीत करण्यात आली असून तिचा शपथविधी सोहळा नुकताच उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूरचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ पीडियाट्रिक्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अनिल राऊत, तर विशेष अतिथी म्हणून विदर्भ असोसिएशनचे सचिव डॉ. गुरुप्रसाद थेटे यांनी उपस्थिती दर्शवली.
मावळते अध्यक्ष डॉ. विजय करमरकर यांनी अध्यक्षपदाची सूत्रे डॉ. वनिता गर्गेलवार यांच्याकडे सोपवली. तसेच मावळते सचिव डॉ. समृद्धी वासनिक यांनी सचिवपदाची धुरा डॉ. भालचंद्र फाळके यांच्याकडे दिली. नव्या कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून डॉ. प्रियदर्शन मुठाळ, खजिनदार म्हणून डॉ. पियुष मुत्यालवार, सहसचिव म्हणून डॉ. विक्रम सद्रानी व डॉ. वरुणा जगताप यांची निवड करण्यात आली आहे.
डॉक्टर समृद्धी वासनिक यांनी मागील दोन वर्षात केलेले योगदान याबद्दल माहिती दिली.
या कार्यक्रमात डॉ. एम. जे. खान यांना त्यांच्या सामाजिक कार्य व बालरोग निर्मूलनासाठी दिलेल्या योगदानाबद्दल ‘लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. राम भारत यांनी डॉ. खान यांच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा सादर केला. त्यानंतर डॉ. मिलिंद कांबळे व सहकाऱ्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात माजी अध्यक्ष डॉ. प्रफुल भास्करवार, डॉ. अपर्णा अंदणकर आणि डॉ. गोपाल मुंदडा यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. या तिघांनीही संघटनेच्या कार्यात मोलाचे योगदान दिले होते.
सूत्रसंचालन डॉ. अश्विनी भारत व डॉ. गोपाल राठी यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. भालचंद्र पालखी यांनी मानले.
याच दिवशी ‘निमोनिया असेसमेंट अँड केअर एज्युकेशन’ या विषयावर कार्यशाळाही पार पडली. यात डॉ. अनिल राऊत, डॉ. गुरुप्रसाद थेटे, डॉ. सचिन पाटील आणि डॉ. राम भारत यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला असिस्टंट सिव्हिल सर्जन डॉ. भास्कर सोनारकर, आरोग्य विभागाच्या जॉइंट डायरेक्टर डॉ. सरिता हजारे, तसेच संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. दुधीवर, डॉ. कुलकर्णी, डॉ. ओमप्रकाश राठी, डॉ. राजीव देवीकर आदी मान्यवर उपस्थित होते.



