आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे रुग्णसेवा अखंडित ठेवण्यासाठी दवाखान्यांना इंधन पुरवठ्याची मागणी
आ.मुनगंटीवार यांचे रुग्णालयात जनरेटरसाठी डिझेल आणि पेट्रोल उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

चांदा ब्लास्ट
आ.मुनगंटीवार यांची आरोग्यसेवेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मागणी
चंद्रपूर :_ रुग्णालयांमधील अत्यावश्यक वैद्यकीय सेवा कोणत्याही परिस्थितीत खंडित होऊ नयेत, यासाठी शासकीय तसेच खाजगी दवाखान्यांना जनरेटरसाठी आवश्यक असलेले डिझेल व पेट्रोल उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सध्याच्या परिस्थितीत पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधन वितरणावर निर्बंध येत असल्याने आरोग्यसेवेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून रुग्णालयांना आवश्यक इंधन पुरवठा सुनिश्चित करावा, अशी भूमिका आ.मुनगंटीवार यांनी मांडली आहे.
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केलेल्या निवेदनात स्पष्टपणे नमूद केले आहे की, विद्युत पुरवठा खंडित झाल्यास रुग्णालयांमध्ये तात्काळ जनरेटरचा वापर करणे अत्यावश्यक ठरते. विशेषतः सुरू असलेल्या शस्त्रक्रियांदरम्यान तसेच अतिदक्षता विभागातील (ICU) आवश्यक यंत्रणा अखंडित चालू राहण्यासाठी सातत्यपूर्ण वीजपुरवठा अनिवार्य असतो. अशा संवेदनशील परिस्थितीत इंधनाचा तुटवडा निर्माण होऊन जनरेटर बंद पडल्यास, उपचार प्रक्रियेत गंभीर अडथळे निर्माण होऊ शकतात आणि त्यामुळे रुग्णांच्या जीवितास थेट धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयांना त्यांच्या मागणीनुसार, संबंधित दवाखान्यांकडून लेखी पत्र सादर केल्यावर पेट्रोल पंप चालकांनी जनरेटरसाठी डिझेल व पेट्रोल उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी आ.सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. आरोग्यसेवा अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.



