ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

धानापूरच्या शाळेत रंगला आठवणींचा मित्रमेळावा..!

माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसोहळा आणि सत्कार कार्यक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_  तालुक्यातील धानापूर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, शालेय व्यवस्थापन समिती आणि माजी विद्यार्थी संघाच्या संयुक्त पुढाकारातून आयोजित स्नेहमिलन सोहळा आणि सत्कार समारंभातून गावात एकात्मतेचा आणि अभिमानाचा अनोखा उत्सव साकारला. एकाच शाळेतून शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपल्या शाळेच्या परिसरात एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला. अनेक वर्षांनी भेटलेल्या मित्रमैत्रिणींमध्ये आनंद, उत्साह आणि भावनिक क्षणांची अनुभूती निर्माण झाली.

या स्नेहसोहळ्यात माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला, ज्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव तर झालाच पण नव्या पिढीसमोर प्रेरणेचा आदर्शही उभा राहिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष रामदास वागदरकर, उद्घाटक डॉ.हेमचंद कन्नाके, सह-उद्घाटक सुनील आत्राम, दीपप्रज्वलन नीता उईके व विद्या मडावी यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागताध्यक्ष म्हणून जगदीश कुचनकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष दर्जा प्राप्त झाला.

सायंकाळी स्नेह भोजनानंतर सुरू झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर करत उपस्थितांची मने जिंकली. या सत्राचे अध्यक्ष नानाजी भोगेकर, उद्घाटक माणिक वागदरकर, सह-उद्घाटक स्वाती वडपल्लीवार व हिराजी कन्नाके होते. दीपप्रज्वलन योगिता वडस्कर व शामराव बावणे यांच्या हस्ते पार पडले, तर स्वागताध्यक्ष म्हणून ऋषीजी कन्नाके यांनी जबाबदारी पार पाडली. विविध पिढ्यांतील माजी विद्यार्थी एकत्र येऊन बालपणीच्या आठवणींना उजाळा देत वातावरण भावनिक बनले.

या स्नेहमिलनाच्या निमित्ताने शाळेच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला तसेच शैक्षणिक विकासासाठी आवश्यक उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. माजी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा दिली. मुख्याध्यापक शेखर दहिवले, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी घेतलेल्या अथक परिश्रमांमुळे हा भव्य कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला असून, संपूर्ण परिसरात या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये