भद्रावती नगरीला येणार अयोध्या नगरीचे स्वरूप
श्रीराम जन्मोत्सव समिती भद्रावती तर्फे श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
अस म्हणतात नव्हे खरही आहे.. राम नाम से बडा कोई नाम नहीं,.. राम नाम से बडा कोई पावन काम नहीं !!
सर्वोच्च मर्यादा, त्याग, बलिदान, श्रेष्ठ भ्राता, पती, पिता, राजा म्हणजेच प्रभू श्रीराम. उत्पती ते ऱ्हास म्हणजेच जन्म ते मृत्यू संपूर्ण हयात जपलं जाते ते फक्त रामनाम.प्रांतकाळी राम, संध्याकाळी राम, सुरवातही राम अन् शेवटही राम जे काही अजरामर असेल ते सर्वच राम. अशी रामनामा ची महिमा अपरंपार आहे.
राम या उच्चारात च १०८ पवित्र मंत्र संचयित असल्याचे म्हटले गेले आहे. स्वागत करण्याची तसेच संवाद साधण्याचे आपल्या संस्कृतीचे प्रारंभनं म्हणजे राम राम अर्थात मी पण राम तू पण राम. राम म्हणजे अंतप्रकाश तात्पर्य आनंद, स्थिरता, शाश्वत तत्वाचे प्रतीक म्हणजे राम.
यात काही राम नाही असे उच्चारण होताच समजून जावे काहीही कसलाही अर्थ नाही. आणि ज्यात राम आहे ते सर्व अर्थपूर्ण आहे. आत्मा आहे तोवर शरीर सजीव ..आत्मा अनंतात विलिन म्हणजे पार्थिव, निर्जीव एकूण सृष्टीतील सर्व अर्थपूर्ण, शाश्वत,आनंदी, स्थिरता या बाबतीत राम या एकमेव नामा ने पाहिल्या जाते. हि राम नामाची महिमा आहे.
धर्म, पंथ, जात, देश, विदेश, पक्ष, हद्द, सीमा, बोली, चालीरीती, भौतिकता, आधुनिकता, परिवर्तन अशा मर्यादेत अडकून न राहणारे अपरिवर्तनीय पवित्र उच्चारण म्हणजे राम.
श्रीराम जन्मोत्सव संपूर्ण भारतभरच नव्हे तर जगभर मोठ्या उत्सवात साजरा केल्या जातो. राम जन्मदिवसाच औचित्य सर्वदूर मोठ्या पावित्र्यात साजरा करण्यात येते.
भद्रावती शहरात श्रीराम जन्मोत्सव उत्सव समिती तसेच गणपती वॉर्ड गवराळा येथे सुद्धा सालाबादा प्रमाणे याही वर्षी येत्या दिनांक २५ व २६ मार्च रोजी मोठ्या उत्सवात साजरी करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
त्या अनुषंगाने स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चे सौजन्य लाभणार असून भव्य प्रारंभी कार्यक्रमाचे व निघणाऱ्या शोभायात्रेचे प्रमुख ठिकाण श्री. विठ्ठल देवस्थान किल्ला वॉर्ड भद्रावती असेल.
दिनांक २५ रोजी दुपारी ३.३० वाजता राजस्थानी महिला मंडळ यांचे संगीत सुंदर कांड, रात्री ८.०० वाजता पुणे विद्यापीठाचे सुवर्ण पदक विजेते, सोनी टीव्ही, झी टीव्ही सन टीव्ही फेम प्रा. डॉ. प्रशांत महाराज ठाकरे व संच अकोला यांचे सुमधुर कीर्तन.२६ मार्च गुरुवारला सकाळी १०.३०ते १.०० वाजेपर्यंत ठाकरे महाराज व संच यांच्या उपस्थितीत किर्तन व श्रीराम जन्म सोहळा त्यानंतर समितीचे अहवाल वाचन अंतिम टप्प्यात सायंकाळी ६.३० वाजता प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचे पूजन बळवंत दादा गुंडावार, मनोहरराव पारधी यांचे हस्ते होऊन शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
शोभायात्रेचे उद्घाटन क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते नियोजित असून या प्रसंगी माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर, आमदार करन देवतळे, नगराध्यक्ष प्रफुल चटकी, तहसीलदार राजेश भांडारकर, पोलिस निरीक्षक भद्रावती योगेश्वर पारधी, गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ, मुख्याधिकारी विशाखा शेळकी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, सामाजिक कार्यकर्ते धनराज आस्वले, डॉ. विवेक शिंदे, निलेश गुंडावार, जैन मंदिर चे प्रकाश कोठारी, माजी नगरसेवक व सर्वसमावेशक सामाजिक कार्यकर्ते सुशील देवगडे, तसेच प्रसिद्ध धर्मनिरपेक्ष व्यक्तिमत्व हाजी बबन शेठ यांची प्रमुख उपस्थिती असेल.
दोन दिवसीय कार्यक्रमाचा व भव्य शोभा यात्रेचा लाभ सर्व भद्रवतीकरांनी घ्यावा असे आवाहन संयोजक चंद्रकांत गुंडावार व उत्सव समिती अध्यक्ष प्रकाश आंईचवार यांनी केले आहे.



