महानगरपालिकेत शहीद दिन साजरा

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे आज २३ मार्च रोजी शहीद दिनानिमित्त भारत मातेचे वीर सुपुत्र भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांना आदरांजली वाहण्यात आली.
उपमहापौर प्रशांत दानव, स्थायी समिती सभापती मनस्वी गिऱ्हे, आयुक्त अकुनुरी नरेश यांच्या हस्ते शहीदांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी बोलतांना उपमहापौर म्हणाले की, “देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहीदांचे बलिदान सदैव प्रेरणादायी आहे. त्यांच्या त्यागामुळेच आपण आज स्वतंत्र भारतात जगत आहोत. त्यांच्या आदर्शांचे स्मरण ठेवून देशसेवा व कर्तव्यनिष्ठा जोपासणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.”
स्थायी समिती सभापती मनस्वी गिऱ्हे यांनी सांगितले की, “शहीदांनी दाखवलेला देशभक्तीचा मार्ग आजच्या पिढीसाठी दिशादर्शक आहे. समाजात राष्ट्रप्रेम, एकता आणि जबाबदारीची भावना वृद्धिंगत करण्यासाठी प्रत्येकाने योगदान देणे आवश्यक आहे.”
कार्यक्रमास उपायुक्त संदीप चिद्रवार,मुख्य लेखाधिकारी मनोज गोस्वामी,नगरसचिव नरेंद्र बोबाटे,सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी,सहायक आयुक्त संतोष गर्गेलवार,प्रगती भुरे,डॉ.अमोल शेळके,माधवी दाणी,मनीषा नैताम तसेच अधिकारी कर्मचारी उपस्थीत होते.



