ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजने’त आता उष्माघाताचाही समावेश..!

आमदार देवराव भोंगळे यांच्या मागणीला मोठे यश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ राज्यातील बळीराजाला दिलासा देण्यासाठी सतत तत्पर असणाऱ्या महायुती सरकारच्या कल्याणकारी धोरणांमध्ये आता आणखी एका महत्त्वपूर्ण निर्णयाची भर पडली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजादरम्यान आमदार देवराव भोंगळे यांनी विधानसभेत मांडलेल्या अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील मागणीला अखेर राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजने’अंतर्गत आता उष्माघातामुळे होणाऱ्या अपघाती मृत्यूचाही समावेश करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय (मामा) भरणे यांनी आज सभागृहात केली.

आमदार देवराव भोंगळे यांच्या संवेदनशील आणि अभ्यासपूर्ण मांडणीमुळेच हा ऐतिहासिक निर्णय झाल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे.

पावसाळी अधिवेशनात म.वि.स. नियम २९३ अन्वये प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होत आमदार देवराव भोंगळे यांनी राज्यातील शेतकरी बांधवांच्या वेदनांना सभागृहात वाचा फोडली होती. उन्हातान्हात शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याला अनेकदा उष्माघाताचा (हिटस्ट्रोक) सामना करावा लागतो. दुर्दैवाने यात काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबावर आभाळ कोसळते. मात्र, प्रचलित नियमांनुसार अशा मृत्यूस ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजने’चा लाभ मिळत नव्हता. ही कायदेशीर त्रुटी आमदार देवराव भोंगळे यांनी आपल्या भाषणातून अत्यंत प्रभावीपणे सरकारसमोर मांडली होती. लोककल्याणकारी राज्य सरकारने यावर तातडीने पाऊल उचलत राज्यातील शेतकरी बांधवांसाठी उष्माघाताचा या योजनेत समावेश करावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली होती.

आमदार देवराव भोंगळे यांच्या या जनहितार्थ आणि संवेदनशील मागणीची दखल घेत आज राज्याचे कृषी मंत्री ना. दत्तात्रय (मामा) भरणे यांनी प्रस्तावाला उत्तर देताना मोठी घोषणा केली. शेतकऱ्यांचे हित हेच या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगत कृषी मंत्र्यांनी उष्माघातामुळे होणाऱ्या अपघाती मृत्यूचा या योजनेत समावेश करण्याचे जाहीर केले. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबांना एक मोठे सुरक्षा कवच मिळाले असून, संकटाच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे बळ सरकारला मिळाले आहे.

आमदार देवराव भोंगळे यांनी केवळ मतदारसंघापुरते मर्यादित न राहता संपूर्ण राज्यातील शेतकरी वर्गाच्या हिताचा विचार करून या प्रश्नाला सभागृहात वाचा फोडल्याने त्यांच्या या दूरदृष्टी आणि अथक प्रयत्नांमुळेच आज राज्य सरकारला हा लोकहितैषी निर्णय घ्यावा लागला. शेतकऱ्यांच्या सुख-दुःखाशी थेट नाळ जोडलेले नेतृत्व म्हणून आमदार देवराव भोंगळे यांचे कार्य या निर्णयामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून, संपूर्ण राज्यभरातील शेतकरी बांधवांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये