गोकुलदास पाटील यांना राज्यस्तरीय कृषी सेवारत्न पुरस्कार जाहीर
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्काराने होणार सन्मान ; बावीस वर्षांच्या अविरत सेवेचा राज्य शासनाकडून गौरव
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ कृषी क्षेत्रात मागील बावीस वर्षांपासून केलेल्या अविरत सेवेची राज्य शासनाने दखल घेतली असून, गोंडपिपरी येथील उप कृषी अधिकारी तथा कृषी अधिकारी ( गुण नियंत्रक ) गोकुळदास पाटील यांना कृषी क्षेत्रात मानाचा समजला जाणारा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न राज्यस्तरीय पुरस्कार सन २०२४ करिता जाहीर करण्यात आला आहे. येत्या १ जुलै २०२६ रोजी मुंबई येथे होणाऱ्या भव्य कार्यक्रमात महामहीम राज्यपाल यांच्या हस्ते मातीशी नाळ जोडणाऱ्या सेवकाचा पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात येणार आहे.
कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या विविध शेतकरी, संस्था व अधिकाऱ्यांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने विविध पुरस्कार देण्यात येतात.
२३ जून रोजी शासनाच्या वतीने २०२४ या वर्षाचे पुरस्कार जाहीर केले. यात चंद्रपूर जिल्यातील गोंडपिपरी तालुक्यातील उप कृषी अधिकारी गोकुलदास पाटील यांना पदमश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
गोकुलदास पाटील हे गेल्या २२ वर्षांपासून कृषी विभागात कार्यरत आहेत. कृषी सहाय्यक या पदापासून त्यांनी आपल्या कार्यकाळाला सुरवात केली. कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक पदावरून पदोन्नती होऊन सध्या ते उप कृषी अधिकारी तथा कृषी अधिकारी (गुण नियंत्रक) या पदावर कार्यरत आहेत.
शेतकरी बांधवांच्या विकासासाठी, शासनाच्या विविध लोकापयोगी योजना अतिशय प्रभावीपणे राबविण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. गोंडपिपरी तालुक्यातील ग्रामीण भागात त्यांनी विविध अभिनव उपक्रम राबविले.
आधुनिक शेती करू बघणाऱ्या महिलांना त्यांनी प्रोत्साहन दिले.
त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय कृषी सेवारत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कार मिळाल्याबाबत तालुका कृषी अधिकारी सचिन पानसरे यांच्यासह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.



