ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

 गोंडपिपरी तालुक्यात महिनाभरात १७ जणांना सर्पदंश

सर्पदंशात ९ पुरुष व ८ महिलांचा समावेश ; महिनाभरात सरासरी दोन हजार सापांना जीवदान ; तात्काळ उपचार करण्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आवाहन.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :- शेतीचा हंगाम ऐन भरात आला असताना, गोंडपिपरी तालुक्यात सर्पदंशाच्या घटनांनी शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.१ जुलै ते ९ ऑगस्टदरम्यान तब्बल १७ शेतकरी व शेतमजुरांना सर्पदंश झाल्याची नोंद झाली असून, यात ९ पुरुष व ८ महिलांचा समावेश आहे. सध्यस्थितीत शेतात रोवणी, कापसाला खत देणे, सोयाबीनची मशागत तसेच मिरची लागवडीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने सर्पदंशाचा धोका वाढला आहे.

तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवर वसलेल्या गोंडपिपरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगल क्षेत्र आहे. ९८ गावांचा विस्तार असलेल्या या तालुक्यात शेती हाच नागरिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रमुख आधार आहे. दरवर्षी सुमारे १८ हजार ५०० हेक्टरवर कापूस, ११ हजार हेक्टरवर भात, १ हजार हेक्टरवर सोयाबीन आणि १ हजार ५०० हेक्टरवर तुरीची लागवड केली जाते. त्यामुळे पावसाळ्यात शेतकऱ्यांचा मोठा वेळ शेतात जात असल्याने सर्पदंशाचा धोका अधिक वाढला आहे.

तालुक्यातील बहुतांश गावे ही वर्धा नदीच्या तीरावर वसलेली असून, अनेक गावांना कन्हाळगाव_ झरन अभयारण्याचे वनक्षेत्रही लागून आहे. त्यामुळे जंगलातील सरपटणाऱ्या सापांचा शेतशिवरात सहजपणे वावर वाढत आहे. सोबतच नदीच्या वाढत्या पाण्याच्या प्रवाहाने अनेक सरपटणारे जीव नदितीरावर आढळून येतात. यामुळेही सर्पदंशाचा धोका वाढला आहे.

याच कालावधीत तालुक्यातील निसर्ग सखा संस्थेच्या वतीने सर्पमित्रांच्या सोबतीने सरासरी दोन हजार सापांना जीवदान दिले आहे. यामध्ये मण्यार, घोणस आणि नाग या विषारी सापांसोबतच अजगर सापांना जीवदान दिले असून अनेक प्रकारच्या बिनविषारी सापांनाही वाचविण्याची माहिती, निसर्ग सखा संस्थेचे अध्यक्ष तथा सर्पमित्र दीपक वांढरे यांनी सांगितले.

घाबरू नका; तात्काळ रुग्णालय गाठा

सर्पदंश झालेल्या ठिकाणी घट्ट बांधू नये, तसेच घरगुती उपचार करण्याऐवजी तातडीने रुग्णालयात दाखल होऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सापाला मारण्याचा प्रयत्न करू नये. सापाची ओळख पटल्यास उपचारासाठी डॉक्टरांना माहिती देणे उपयुक्त ठरते. सर्पदंश झाल्यास घाबरून न जाता तात्काळ दवाखान्यात उपचार घ्यावेत.

_डॉ.कमलेश पिल्लेवाल
तालुका वैद्यकीय अधिकारी,
गोंडपिपरी

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये