श्रावणाच्या हिरवाईत रंगला “भाजीपाला अलंकार” सोहळा!
सनराईज योगा ॲक्टिव्हिटी बेनिफिट वुमेन्स ग्रुपचा अभिनव उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर :- श्रावण महिन्याचे औचित्य साधून पावसाळ्यात उपलब्ध होणाऱ्या ताज्या पालेभाज्या व भाजीपाल्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी सनराईज योगा ॲक्टिव्हिटी बेनिफिट वुमेन्स ग्रुपतर्फे भाजीपाला अलंकार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. महिलांच्या सृजनशीलतेला आणि कलागुणांना व्यासपीठ देणाऱ्या या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या निखाडे यांनी केले, तर प्रास्ताविक तसेच आयोजन व नियोजन सनराईज ग्रुपच्या संचालिका कुंतल चव्हान यांनी केले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व परीक्षक म्हणून कीर्ती ताई आगलावे, ज्योती ठीपे व प्रा प्रगती आगे उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात माधुरी चटारे यांच्या सुंदर स्वागत नृत्याने झाली.
स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. प्रथम पारितोषिक – लिना ताई लांजेकर द्वितीय पारितोषिक – अंजू ताई विश्वास तृतीय पारितोषिक – पल्लवी इंगोले यांना मिळाले, यानंतर मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. सर्व सहभागी महिलांचेही विशेष कौतुक करण्यात आले. आभार प्रदर्शन छाया टोंगे यांनी केले.
श्रावणातील पावसाळी वातावरण, निसर्गाची हिरवाई आणि ताज्या पालेभाज्या-भाजीपाल्याचा सुंदर मिलाफ या उपक्रमातून अनुभवायला मिळाला. महिलांच्या कल्पकतेसोबतच निरोगी आहार, स्थानिक भाजीपाला आणि निसर्गाशी जोडलेपणाचा संदेश या स्पर्धेतून देण्यात आला.
महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, मान्यवरांची उपस्थिती आणि सुंदर नियोजनामुळे “भाजीपाला अलंकार स्पर्धा” उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे संपन्न झाली.



