ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोंडपिपरीतील लॉज ठरताहेत आंबटशौकीनांचे “करमणूक केंद्र?”

अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढले जात असल्याचा संशय ; आर्थिक लाभासाठी गैरप्रकारांकडे लॉजमालकांचे दुर्लक्ष ; प्रशासनाच्या चौकशीकडे नागरिकांचे लक्ष

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :- शहरातील काही लॉजच्या कारभाराबाबत दिवसेंदिवस संशयाचे वातावरण निर्माण होत असून, या ठिकाणी आंबटशौकीनांचा वावर वाढल्याच्या चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहेत. विशेषतः अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या किंवा अन्य आमिषाच्या जाळ्यात ओढून अशा ठिकाणी आणले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या गंभीर बाबींची प्रशासनाने तातडीने चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

गोंडपिपरी शहरात विविध कारणांसाठी येणाऱ्या नागरिकांना निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लॉज सुरू आहेत. मात्र, काही लॉजमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तींची ओळख, वय आणि आवश्यक कागदपत्रांची योग्य पडताळणी केली जाते का, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. लॉजमध्ये अल्पवयीन मुलींचा वापर किंवा त्यांचे शोषण होत असल्याचा संशय असेल, तर ही बाब अत्यंत गंभीर असून संबंधित यंत्रणांनी केवळ कागदोपत्री कारवाई न करता प्रत्यक्ष तपास करणे गरजेचे आहे.

लॉज व्यवसायातून मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नाच्या लालसेपोटी काही ठिकाणी संशयास्पद हालचालींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. लॉजमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाची ओळखपत्र तपासणी, वयाची खातरजमा, नोंदवहीची नियमित तपासणी तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास संबंधित यंत्रणेला माहिती देणे अपेक्षित आहे. या नियमांचे पालन होत नसेल तर संबंधित लॉजमालकांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.

अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

अल्पवयीन मुलींना प्रेमाचे आमिष दाखवून किंवा अन्य कोणत्याही मार्गाने जाळ्यात ओढल्या जात असल्याचे प्रकार घडत असताना, शहरातील लॉजमध्ये अचानक तपासणी मोहीम राबवून नोंदवही, सीसीटीव्ही फुटेज, ग्राहकांच्या ओळखपत्राची नोंद आणि नियमांचे पालन यांची पडताळणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

प्रशासनाकडून अपेक्षा..!

गोंडपिपरीतील लॉज व्यवसायाला नियमांची चौकट असतांनाही त्याचा गैरवापर होत असेल, तर संबंधितांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. याकरिता पोलिस प्रशासन आणि संबंधित स्थानिक प्रशासनाने चौकशी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गोंडपिपरीमध्ये चालणाऱ्या या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन प्रशासन प्रत्यक्ष चौकशी करणार का.?, याकडे तालुकवासीयांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये