ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाघाचा बैलावर हल्ला ; शेतशिवारात वाघाची दहशत

बैल जखमी; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण, वनविभागाने तातडीने गस्त वाढवून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली शेतशिवारात वाघाचा वावर वाढल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, गोजोली येथील मधुकर मडावी या शेतकऱ्याच्या बैलावर वाघाने हल्ला केल्याची घटना आज समोर आली असून या हल्ल्यात बैल जखमी झाला आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून, वनविभागाने तातडीने या परिसरात लक्ष देण्याची मागणी होत आहे.

शेतशिवारात वाघाचा वावर असल्याने शेतकऱ्यांना दिवसाढवळ्याही शेतात जाण्याची भीती वाटत आहे. शेतीची कामे सुरू असताना वाघाचे दर्शन झाल्यास मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः शेतात काम करणारे शेतकरी, मजूर तसेच गुरे चरायला नेणाऱ्या नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

अलीकडेच मागील आठवड्यात चिवंडा येथील गुराख्यावर वाघाने हल्ला करून जखमी केल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा बैलावर हल्ला करण्यात आल्याने वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीजवळील वावर पुन्हा एकदा चर्चेत आला असून, परिसरातील शेतकऱ्यांनी वनविभागाला माहिती देत वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची मागणी केली आहे.

वाघाच्या पावलांचे ठसे, गुरांवरील हल्ले अथवा वाघाचा प्रत्यक्ष वावर आढळून आल्यास वनविभागाने तातडीने पाहणी करणे आवश्यक आहे. तसेच संबंधित परिसरात नियमित गस्त वाढवून कॅमेरे किंवा इतर आवश्यक उपाययोजना करण्याची गरज आहे. वाघाचा वावर निश्चित असल्यास नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांनी एकट्याने शेतात जाणे टाळावे, विशेषतः पहाटे व सायंकाळच्या वेळी अधिक काळजी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वाघाच्या वावरामुळे शेतकऱ्यांच्या शेतीकामांवर परिणाम होण्याची शक्यता असून, वनविभागाने केवळ घटना घडल्यानंतर कारवाई न करता प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.

शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत वनविभागाने तातडीने परिसराची पाहणी करून वाघाच्या हालचालींचा मागोवा घ्यावा आणि आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी आणि ग्रामस्थांकडून होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये