घोडनकप्पी ग्रामस्थांचा श्रमदानातून रस्त्यासाठी पुढाकार
जागतिक मुळनिवासी दिनी ग्रामस्थांनी तयार केला तात्पुरता कच्चा मार्ग; कायमस्वरूपी पक्का रस्ता करण्याची शासनाकडे मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
मौजा घोडनकप्पी, ता. जिवती, जि. चंद्रपूर हे अतिदुर्गम व डोंगराळ भागात वसलेले गाव असून गावात ये-जा करण्यासाठी योग्य रस्ता उपलब्ध नसल्यामुळे ग्रामस्थांना अनेक वर्षांपासून डोंगराळ व कठीण मार्गाने पायी ये-जा करावी लागत आहे. रस्त्याअभावी आरोग्यसेवा, विद्यार्थ्यांचे शिक्षण, शेतमालाची वाहतूक तसेच दैनंदिन गरजांसाठी ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रस्त्याअभावी गावातील संगीता तुळशीराम गेडाम या गर्भवती महिलेला अत्यंत दुर्दैवी प्रसंगाला सामोरे जावे लागले. डोंगर चढून जात असताना त्यांनी डोंगरावरील मार्गावर बाळाला जन्म दिला आणि दुर्दैवाने त्याच ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे घोडनकप्पी गावासाठी सुरक्षित व कायमस्वरूपी रस्त्याची आवश्यकता पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर आली.
गावासाठी पक्का रस्ता तयार करण्यात यावा यासाठी ग्रामस्थांनी शासन व संबंधित प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. मात्र अद्याप प्रत्यक्ष रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे अखेर ९ ऑगस्ट २०२६ रोजी जागतिक मुळनिवासी दिनानिमित्त ग्रामस्थांनी एकत्र येऊन श्रमदानाच्या माध्यमातून तात्पुरत्या स्वरूपात ये-जा करण्यासाठी कच्चा मार्ग तयार केला.
सदर कच्चा मार्ग तयार करताना कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करण्यात आलेली नाही. डोंगराच्या मूळ भौगोलिक परिस्थितीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही तसेच वनसंपदा, पर्यावरण अथवा निसर्गाची कोणत्याही प्रकारे हानी करण्यात आलेली नाही, असे ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे. उपलब्ध नैसर्गिक मार्गाचा वापर करून श्रमदानातून तात्पुरता ये-जा करण्यायोग्य मार्ग तयार करण्यात आला.
या श्रमदानासाठी दिवंगत संगीता गेडाम यांचे पती तुळशीराम बापुराव गेडाम, गावपाटील जैतू रघु जुमनाके आणि सरपंच लक्ष्मीकांत कोटनाके यांनी पुढाकार घेतला. तसेच गोंदोला समूहाने ग्रामस्थांना श्रमदानासाठी सहकार्य केले.
घोडनकप्पी गाव हे डोंगराच्या खालील भागात असून शाळा डोंगरावर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दररोज डोंगराळ मार्गाने शाळेत ये-जा करावी लागते. विशेषतः पावसाळ्यात विद्यार्थ्यांची गैरसोय आणि सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर होतो. त्याचप्रमाणे रस्त्याअभावी गावातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल बाजारपेठेत नेण्यासाठीही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रस्ता हा केवळ वाहतुकीचा मार्ग नसून तो आरोग्य, शिक्षण, शेती, रोजगार आणि गावाच्या सर्वांगीण विकासाची जीवनवाहिनी आहे. भविष्यात रस्त्याअभावी कोणत्याही व्यक्तीची जीवितहानी होऊ नये, गर्भवती महिला व रुग्णांना वेळेत आरोग्यसेवा मिळावी, विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे शाळेत जाता यावे आणि शेतकऱ्यांना आपला शेतमाल सहजपणे बाजारपेठेत नेता यावा, यासाठी घोडनकप्पी गावाला कायमस्वरूपी पक्का रस्ता उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
“आम्ही श्रमदानातून तात्पुरता मार्ग तयार केला आहे; आता शासन व प्रशासनाने आमच्या मूलभूत गरजेची तातडीने दखल घेऊन घोडनकप्पी गावासाठी कायमस्वरूपी पक्का रस्ता लवकरात लवकर तयार करून द्यावा,” अशी मागणी समस्त ग्रामस्थांनी केली आहे.
“गाव तेथे रस्ता — रस्ता तेथे आरोग्य, शिक्षण, शेती आणि विकास.”
— समस्त ग्रामस्थ, मौजा घोडनकप्पी
सहकार्य : गोंदोला समूह



