ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाचन, अभ्यास आणि सातत्यातूनच यशाचा मार्ग : प्रा. धनश्री चिताडे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

गडचांदूर :- “आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी पुरेशी नसून सामान्यज्ञान, चालू घडामोडींचे ज्ञान आणि सातत्यपूर्ण अभ्यास आवश्यक आहे. वाचन, अभ्यास आणि सातत्यातूनच यशाचा मार्ग प्रशस्त होतो,” असे प्रतिपादन युगचेतना ग्रामविकास संस्थेच्या सचिव प्रा. धनश्री चिताडे यांनी केले.

प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालय, गडचांदूरतर्फे आयोजित ‘युवा ज्ञान कुंभ – सामान्य ज्ञान परीक्षा-२०२६’ च्या बक्षीस वितरण समारंभात त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. गडचांदूर, कोरपना, राजुरा व जिवती परिसरातील इयत्ता अकरावी, बारावी तसेच पदवीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत उत्स्फूर्त सहभाग घेतला.

प्रमुख मार्गदर्शक डॉ. दिवाकर चौधरी व डॉ. राजकुमार मुसने यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी सामान्यज्ञान व चालू घडामोडींच्या सातत्यपूर्ण अभ्यासाचे महत्त्व पटवून दिले. ‘युवा ज्ञान कुंभ’ हा विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला दिशा देणारा उपक्रम असून, ग्रामीण भागातूनही अधिकारी घडावेत हेच आमचे ध्येय आहे, असे डॉ. मुसने यांनी सांगितले.

परीक्षेत शिपाली अनिल टेकाम प्रथम, श्रुतिका प्रवीण दातारकर द्वितीय, मारोती तिरुपती मुंडे तृतीय, मानसी विजय बानकर चतुर्थ तर सानिका संजय क्षीरसागर हिने पाचवा क्रमांक मिळविला. गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व पुस्तके देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाला रमेश राठोड, प्राचार्य नानेश्वर धोटे, प्रतीक मून यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य नानेश्वर धोटे यांनी केले. संचालन प्रा. छाया गायकवाड यांनी, तर आभार प्रदर्शन खुशी करमनकर हिने केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये