गडपांढरवणीत श्रमदानातून रस्त्याला नवसंजीवनी
ग्रामसभेच्या हाकेला प्रतिसाद देत २०० मीटर रस्ता चकाचक
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- तालुक्यातील गडपांडरवाणी येथील मूळनिवासी ग्रामस्थांनी पारंपरिक ग्रामसभेतील निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करत श्रमदानातून सुमारे २०० मीटर रस्त्याची दुरुस्ती केली. खराब रस्त्यामुळे नागरिक, शाळकरी विद्यार्थी व गावात ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
२४ सप्टेंबर रोजी झालेल्या पारंपरिक ग्रामसभेत शासनाच्या कामाची प्रतीक्षा न करता तातडीने श्रमदानातून रस्ता दुरुस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ग्रामस्थांनी सामूहिक श्रमदान करून रस्ता वाहतुकीस योग्य केला.
गडपांडरवाणीचे उपसरपंच लच्चू सोयाम यांनी सांगितले की, सदर रस्त्याच्या कामाचा आराखडा मंजूर असून शासनस्तरावर कायमस्वरूपी काम होणे अपेक्षित आहे. तोपर्यंत नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी ग्रामस्थांनी हा तात्पुरता उपाय केला. या उपक्रमासाठी शंकर वेट्टी, भिमराव कुमरे व लिंगोराव सोयाम यांनी ग्रामस्थांना प्रोत्साहन दिले.
‘निर्णय आमचा, श्रम आमचे, विकास आमचा’ या भावनेतून ग्रामस्थांनी एकजुटीचे उदाहरण घडवून आणले.



