सेवा संकल्प अभियानातून धोंडाअर्जुनीत ग्रामस्वच्छता व नशामुक्तीचा निर्धार
पारंपरिक ग्रामसभेत ग्रामविकास, पेसा अंमलबजावणीसह विविध विषयांवर सर्वानुमते ठराव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून धोंडाअर्जुनी (गोंडगुडा) येथे ग्रामस्वच्छता, नशामुक्ती, ग्रामविकास आणि पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी यासाठी ग्रामस्थांनी एकजुटीने पुढाकार घेतला. शनिवार, २७ सप्टेंबर रोजी रात्री ८ ते १० वाजेदरम्यान मुंडा निवासी पारंपरिक ग्रामसभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या ग्रामसभेत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध महत्त्वपूर्ण ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
या ग्रामसभेला धोंडाअर्जुनी परिसरासह परिसरातील विविध गावांमधील मुळनिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. लेखा-मेंढा गावाच्या धर्तीवर ग्रामव्यवस्थेत सुधारणा करणे, पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, समाजसुधारणा, नशामुक्ती, ग्रामस्वच्छता आणि गावाच्या विकास प्रक्रियेत लोकसहभाग वाढविणे या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
ग्रामसभेत घेतलेल्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी २८ सप्टेंबर रोजी सकाळी करण्यात आली. ग्रामस्थांनी एकत्र येत गावातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, परिसर तसेच सांडपाण्याच्या ठिकाणांची स्वच्छता केली. प्रत्येक कुटुंबाने स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतल्याने ग्रामस्वच्छता अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. स्वच्छ, सुंदर आणि निरोगी गाव निर्माण करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
*दारूमुक्त व नशामुक्त गावासाठी सामूहिक संकल्प*
ग्रामसभेतील ठरावानुसार ग्रामस्थांनी दारूमुक्त आणि नशामुक्त गावाचा सामूहिक संकल्प केला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येरमी-येसापूरचे मुख्याध्यापक लिंगोराव सोयाम यांनी नशेचे सामाजिक, आर्थिक व कौटुंबिक दुष्परिणाम तसेच नशामुक्तीचे फायदे याबाबत मार्गदर्शन केले. नशामुक्त गावाच्या निर्मितीसाठी ग्रामस्थांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या उपक्रमाला धोंडाअर्जुनीच्या सरपंच जुमनाके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नामदेव जुमनाके, गावपाटील गोविंदराव कन्नाके, जुगदराव सिडाम, पोलीस पाटील कोवे, अंगणवाडी सेविका आणि आशा स्वयंसेविकांसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
ग्रामसभेला जिवती पंचायत समितीचे प्रथम सभापती भीमराव मेश्राम, शंकर वेट्टी, जंगू मेश्राम, लिंगोराव सोयाम, संतोष सल्लाम, शित्रू गेडाम, धर्मराव मडावी, विशेषता कोटनाके, चैनराव मडावी, आदर्श गाव महापांढरवाणीचे गावपाटील मानकु धुर्वे, इसरू आडे तसेच कारगाव खुर्द, आसापूर, घारपणा, नागापूर, गढपांढरवाणी आणि महापांढरवाणी येथील मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.



