हातचालाकीने सोने चोरी करणाऱ्या महिला आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक
सोन्याचा मुद्देमाल जप्त करून 2 गुन्हे उघडकीस

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन वर्धा (शहर) हद्दीत दुकानांमधून हातचालाकी करून सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या एका सराईत महिला आरोपीला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा च्या पथकाला यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी महिला आरोपीने चोरी केलेला गुन्ह्यातील सोन्याचा मुद्देमाल जप्त केला असून दोन गुन्हे उघडकीस आणले आहे.
पोलीस स्टेशन (शहर) हद्दीतील दोन वेगवेगळ्या सोनारांच्या दुकानांमध्ये अनुक्रमे 12 सप्टेंबर 2026 व 20 सप्टेंबर 2026 रोजी हातचालाकी करून सोन्याचे दागिने चोरी गेल्याच्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी वर्धा (शहर) पोलीस स्टेशन येथे **अपराध क्रमांक 1585/2026** व **1589/2026** कलम 303(2) बी.एन.एस. अन्वये गुन्हे नोंद करण्यात आले होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या गुन्ह्यांचा समांतर तपास करत असताना, घटनास्थळांचे सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित महिला आरोपी ही हिंगणघाट येथे असल्याची माहिती मिळाली. पथकाने तात्काळ हिंगणघाट गाठून संशयित महिला आरोपी नामे शेख रूमाना ऊर्फ शबाना उर्फ मुस्कान शेख आरिफ वय 29 वर्ष राहणार संत तुकडोजी वार्ड हिंगणघाट हिच्याबाबत माहिती काढून तिच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. महिला आरोपीकडे सखोल व कसून चौकशी केली असता, तिने वर्धा शहरात दोन ठिकाणी हातचालाकीने सोन्याची चोरी केल्याची पंचासमक्ष कबुली दिली. चोरी केलेले सोन्याचे दागिने तिने हिंगणघाट येथील ज्वेलर्स दुकानांमध्ये “मुलगी आजारी असून उपचारासाठी पैशांची तातडीची गरज आहे” असे सांगून गहाण ठेवले होते. पोलीस पथकाने पंचांसोबत संबंधित सराफा दुकानांवर जाऊन चौकशी केली आणि महिला आरोपी हिने गुन्ह्यात चोरी केलेला १) **1.630 ग्रॅम वजनाचे सोन्याचे टॉप्स:** किंमत रु. 22,900/- रु. २) **2.620 ग्रॅम वजनाचे सोन्याचे टॉप्स:** किंमत रु. 36,800/- रु **एकूण जुमला किंमत 59,600/- रु. चा मुद्देमाल जप्ती पंचनामाप्रमाणे जप्त केला ** महिला आरोपीला ताब्यात घेऊन, जप्त मुद्देमालासह पुढील कायदेशीर तपासासाठी वर्धा (शहर) पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. वर्धा (शहर) पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
सदर यशस्वी कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभकुमार अग्रवाल, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उपनि. विजयसिंग गोमलाडू, पोलीस अंमलदार मनोज धात्रक, महादेव सानप, हर्षल सोनटक्के, अभिषेक नाईक ,पल्लवी बोबडे, सर्व स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा व प्रतिक वांदिले सायबर सेल वर्धा यांनी पार पाडली आहे. नागरिकांनी आपल्या दागिन्यांची आणि सामानाची काळजी घ्यावी, तसेच संशयित हालचाल दिसून आल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन वर्धा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.



