थकीत वीजबिलापोटी आक्सापुरातील नळयोजना बंद
महिलांचा पाण्यासाठी आक्रोश! ; १ लाख ८० हजारांच्या वीजबिलासाठी वीजपुरवठा खंडित
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ तालुक्यातील आक्सापूर गावातील नळ पाणीपुरवठा योजना वीजबिल थकीत असल्याने बंद पडल्याने आक्सापूर ग्रामस्थांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. तब्बल १ लाख ८० हजार रुपयांचे वीजबिल थकीत असल्याने विद्युत वितरण विभागाने पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित केला आहे. परिणामी गावातील नियमित नळयोजना ठप्प झाली असून महिलांना पाण्यासाठी बोअरवेल व विहिरींचा आधार घ्यावा लागत आहे.
गावातील पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीत करण्यासाठी ग्रामपंचायतीने थकीत वीजबिलाचा प्रश्न तातडीने मार्गी लावणे अपेक्षित असताना प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याची ग्रामस्थांची नाराजी आहे. ग्रामपंचायतीवर प्रशासक असल्याने पाणीपट्टी व इतर करांची वसुलीही अपेक्षित पद्धतीने होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. वसुलीअभावी ग्रामपंचायतीच्या उत्पन्नावर परिणाम होत असून विकासकामांनाही ब्रेक लागल्याची चर्चा आहे.
सध्या नळातून पाणी येत नसल्याने सकाळपासूनच महिलांना हातात हंडे घेऊन पाण्याच्या शोधात फिरावे लागत आहे. काही कुटुंबे बोअरवेल तर काही विहिरींवर अवलंबून आहेत. पावसाळा संपत असतानाच पाणीपुरवठा यंत्रणा बंद पडल्याने आगामी काळात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे.
“नळयोजना बंद असल्याने घरातील दैनंदिन कामांसाठी पाणी आणताना महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. थकीत वीजबिलाचा प्रश्न सोडवून गावचा पाणीपुरवठा तातडीने सुरू करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
मात्र, विद्युत वितरण विभागाकडून थकीत वीजबिलाची पूर्ण रक्कम भरण्यात आल्यानंतरच वीजपुरवठा सुरू केला जाईल, अशी भूमिका घेण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायत प्रशासन थकीत रक्कम कशी भरणार आणि बंद पडलेली नळयोजना कधी सुरू करणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
गावातील मूलभूत सुविधा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाची असताना पाणीपुरवठ्यासारख्या अत्यावश्यक योजनेचा वीजपुरवठा खंडित होईपर्यंत थकीत बिलाचा प्रश्न प्रलंबित राहणे ही बाब गंभीर असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे. प्रशासकांनी तातडीने विद्युत वितरण विभागाशी समन्वय साधून तोडगा काढावा आणि आक्सापुरातील नळ पाणीपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.



