ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्वातंत्र्यानंतरही एस.टी. बसचा पत्ता नाही; विद्यार्थ्यांचा रोजचा ‘जंगलवाटेचा’ प्रवास!

डोंगरगावला बससेवेची प्रतीक्षा कायम; बस सुरू करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी व ग्रामस्थ आक्रमक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ तालुक्यातील दुर्गम डोंगराळ परिसरातील डोंगरगावला स्वातंत्र्य मिळून दशके उलटूनही अद्याप एस.टी. बससेवा पोहोचलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना आजही दळणवळणाच्या मूलभूत सुविधेसाठी संघर्ष करावा लागत आहे. शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रोज जंगलवाटेने पायी अथवा मिळेल त्या वाहनाने प्रवास करावा लागत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

डोंगरगाव परिसरात अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी बाहेरगावी जातात. मात्र गावात नियमित एस.टी. बस नसल्याने विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रवासच जणू जंगलवाटेचा प्रवास बनला आहे. पावसाळ्यात रस्त्यांची अवस्था अधिक बिकट होत असून, विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. वेळेवर वाहन न मिळाल्यास शाळा-महाविद्यालय गाठणेही कठीण होते.

बससेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी शेकडो विद्यार्थी व ग्रामस्थांनी आगारात धाव घेत प्रशासनाचे लक्ष वेधले. गावासाठी नियमित बसफेरी सुरू करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. अनेक वर्षांपासून मागणी करूनही ठोस कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

एस.टी. बस ही केवळ प्रवासाची सुविधा नसून ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची जीवनवाहिनी आहे. बसअभावी विद्यार्थ्यांना वेळ, पैसा आणि सुरक्षिततेचा प्रश्न सहन करावा लागत आहे. विशेषतः मुलींच्या शिक्षणासाठी सुरक्षित व नियमित सार्वजनिक वाहतूक उपलब्ध असणे आवश्यक आहे.

*‘स्वातंत्र्य मिळाले; पण प्रवासाचे स्वातंत्र्य कधी?’*

स्वातंत्र्यानंतर देशाने विकासाची अनेक शिखरे गाठली असताना डोंगरगावसारख्या गावाला अद्याप साधी एस.टी. बससेवा मिळू नये, ही ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्थेची गंभीर बाब असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. प्रशासनाने विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेऊन तातडीने डोंगरगावला नियमित एस.टी. बससेवा सुरू करावी, अशी मागणी जोर धरत आहे. बससेवा सुरू होईपर्यंत पाठपुरावा सुरूच ठेवण्याचा निर्धार विद्यार्थी व ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये