राजुरात उद्या काँग्रेसचा जनआक्रोश ; शेतकरी, बेरोजगारांसह विविध प्रश्नांवर आंदोलनाचा एल्गार
कर्जमाफी, धानाला योग्य भाव व बोनस, स्मार्ट मीटरला विरोध; _गोंडपिपरी तालुक्यातील कार्यकर्त्यांना सहभागी होण्याचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ शेतकरी, शेतमजूर, महिला, बेरोजगार तरुण तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. २८ सप्टेंबर रोजी राजुरा येथे जनआक्रोश आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, प्रोत्साहनपर रक्कम तातडीने जमा करणे, धानाला योग्य भाव व बोनस देणे, स्मार्ट मीटरला विरोध यासह विविध मागण्या आंदोलनातून मांडण्यात येणार आहेत.
शेतकऱ्यांच्या कर्जाचा प्रश्न, कृषी मालाला मिळणारा भाव आणि शासनाकडून अपेक्षित आर्थिक मदत या मुद्द्यांवर आंदोलनातून आवाज उठविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना धानाला योग्य भाव व बोनस द्यावा, तसेच प्रोत्साहनपर रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने जमा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच स्मार्ट मीटरवर बंदी घालावी आणि शेतकऱ्यांना सिंचनासाठी इलेक्ट्रिक मीटर जोडणीसंदर्भातील निर्णय तातडीने घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील वीजपुरवठा आणि शेतीसाठी आवश्यक वीज उपलब्धतेचा प्रश्नही आंदोलनाच्या माध्यमातून उपस्थित केला जाणार आहे.
जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीचा विचार करून शासनाने संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा आणि तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली आहे. दुष्काळाचा शेती उत्पादनावर होणारा परिणाम लक्षात घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, अशी भूमिका मांडण्यात येणार आहे.
आंदोलनात केवळ शेतकरी प्रश्नांपुरते मर्यादित न राहता विद्यार्थी, महिला आणि बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांवरही आवाज उठविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या पेपरफुटीला आळा घालावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच गॅस व पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी कराव्यात, महिलांना त्यांच्या योजनांचा लाभ मिळवून द्यावा आणि बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय लघुउद्योग व छोट्या व्यावसायिकांच्या अडचणी दूर करून त्यांना आवश्यक सहकार्य मिळावे, अशी मागणीही आंदोलनातून करण्यात येणार आहे.
*गोंडपिपरीतून मोठ्या सहभागाचे आवाहन*
या आंदोलनात गोंडपिपरी तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते, काँग्रेसप्रेमी, महिला, शेतकरी, शेतमजूर आणि बेरोजगार तरुण-तरुणींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. गोंडपिपरी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अशोक रेचनकर यांच्या वतीने तालुक्यातील जनतेला आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



