‘अश्रू, पाऊस आणि टाळ्यांचा गजरात नेवजाबाई भैया हितकारिणीच्या बाप्पाला ब्रह्मपुरीकरांचा भावपूर्ण निरोप
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रह्मपुरी :_ ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात, ढोल-ताशांचा गजर आणि भक्तिमय वातावरणात ब्रह्मपुरीतील प्रसिद्ध नेवजाबाई भैया हितकारिणी सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणरायाचे अनंत चतुर्दशीच्या दिवशी अत्यंत थाटामाटात व भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. तब्बल १२ दिवसांच्या पाहुणचारानंतर बाप्पाला निरोप देताना ब्रह्मपुरीकरांचे डोळे पाणावले होते, तर स्वागतासाठी पडणाऱ्या पावसाच्या सरींनी जणू वरूणराजानेही या निरोप समारंभाला हजेरी लावल्याचा भास होत होता.
मंडळाच्या भव्य मंडपातून (शिक्षण संस्थेच्या आवारातून) विसर्जन मिरवणुकीची दिमाखात सुरुवात झाली. ढोल-ताशा पथकाचा कडकडाट, भजनी दिंडीचा भक्तिभाव आणि कार्यकर्त्यांनी साकारलेले आकर्षक देखावे हे या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले. ही भव्य मिरवणूक शहरातील प्रमुख मार्ग असलेल्या सम्राट अशोक चौक, रेणुका माता चौक, मर्दान अली चौक आणि बाजार चौक मार्गे पुढे सरकत कोट तलाव येथे पोहोचली. तेथे बाप्पाच्या मूर्तीचे विधिवत व शास्त्राक्त पद्धतीने विसर्जन करण्यात आले.
या निरोप सोहळ्याला मंडळाचे संचालक तथा प्रथम नगराध्यक्ष अशोक भैया, उद्योजक निलेश मोहता, दुर्गादास मोहता, अजय भट्टड, प्रसिद्ध उद्योजक व माजी नगरसेवक गौरव भैया, यांच्यासह मंडळाचे सर्व संचालक, पदाधिकारी, महिला व बालचमू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
गेल्या १२ दिवसांपासून आनंदमेळावा आणि वैचारिक उपक्रमांनी दुमदुमून गेलेल्या या मंडपातील बाप्पाच्या विसर्जनामुळे लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वच नागरिक भावुक झाले होते. विशेषतः गेल्या १२ दिवसांत बाप्पाशी जोडली गेलेली लहान मुले बाप्पाच्या जाण्याने अत्यंत दुखावली होती. शालेय विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी रस्त्यावर उतरून, नाचत-गाजत आनंद व्यक्त करत बाप्पाकडे पुढील वर्षी लवकर येण्याचे साकडे घातले.
‘निरोप घेतो आता आज्ञा असावी, चुकले आमचे काहीं त्याची क्षमा असावी…’ या भावनाव्यक्त करणाऱ्या ओळींनी संपूर्ण परिसर गहिवरून गेला होता. शिस्तबद्धता, सामाजिक भान आणि भव्यतेचा संगम साधत नेवजाबाई भैया हितकारिणी गणेश मंडळाने यंदाचा गणेशोत्सव अत्यंत अभूतपूर्व आणि स्मरणीय ठरवला.



