तिकिटाच्या १५ रुपयांवरून एसटी वाहक महिलेशी हुज्जत; मद्यधुंद प्रवाशाची शिवीगाळ अन् नोकरी घालविण्याची धमकी!
‘तुम्हाला अजून ओळखले नाही, नोकरी घालवतो’; मद्यधुंद प्रवाशाची महिला एसटी वाहकाशी अरेरावी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा : एसटी बसमधून प्रवास करताना तिकिटाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून मद्यधुंद प्रवाशाने महिला एसटी वाहकाशी हुज्जत घालत शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, तिकिटाचे १५ रुपये मागितल्याचा राग मनात धरून संबंधित प्रवाशाने महिला वाहकाला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची तसेच नोकरी घालविण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर रमेश खार्डे (रा. आळंद) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शारदा विनोद तुपकर (वय ४०, रा. अंढेरा, ता. देऊळगाव राजा) या एसटी महामंडळात वाहक म्हणून कार्यरत आहेत. गुरुवार, १२ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४.३० वाजताच्या दरम्यान त्या आपल्या कर्तव्यावर असताना आळंद गावाकडील रस्त्यावर हा प्रकार घडला.
दरम्यान, ज्ञानेश्वर रमेश खार्डे हा मद्यप्राशन करून एसटी बसमध्ये प्रवास करत होता. वाहक शारदा तुपकर यांनी त्याच्याकडे तिकिटाचे १५ रुपये मागितले असता, त्याने तिकिटाचे केवळ पाच रुपयेच झाले असल्याचे सांगत उर्वरित पैसे देण्यास विरोध केला. तसेच आपणाकडून जास्त पैसे मागून बाकीचे पैसे चोरत असल्याचा आरोप करीत त्याने वाहक महिलेशी वाद घालण्यास सुरुवात केली.
अपंगत्वाचे कार्ड दाखविण्यास सांगताच अरेरावी!
प्रवाशाने आपल्याकडे दिव्यांग व्यक्तीचे कार्ड असल्याचे सांगितल्यानंतर वाहक तुपकर यांनी त्याला संबंधित कार्ड दाखविण्यास सांगितले. मात्र, त्याने कार्ड दाखविण्यास नकार दिला. उलट, ‘मी तुमची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करतो, तुमची नोकरी घालवतो. तुम्ही मला अजून ओळखले नाही,’ अशा शब्दांत त्याने धमकावल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
इतकेच नव्हे, तर तिकिटाचे पैसे देणार नाही आणि दिव्यांगत्वाचे कार्डही दाखविणार नाही, अशी भूमिका घेत त्याने वाद अधिकच वाढविला. संबंधित प्रवासी मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत असल्याचे लक्षात आल्यानंतर वाहक तुपकर यांनी त्याला बसमधून खाली उतरण्यास सांगितले. मात्र, यावरून त्याने महिला वाहकाला शिवीगाळ करीत हुज्जत घातली आणि दमदाटी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
महिला कर्मचाऱ्याच्या कर्तव्य बजावण्यात अडथळा
शासकीय परिवहन सेवेतील महिला कर्मचाऱ्याला कर्तव्य बजावत असताना अशा प्रकारे शिवीगाळ, दमदाटी आणि धमकीला सामोरे जावे लागल्याने या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. याप्रकरणी शारदा विनोद तुपकर यांच्या तक्रारीवरून देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात कायम गुन्हा क्रमांक ५०५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २२१, ३५२, ३५१ (२), ३५१ (३) तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ८५ (१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शरद साळवे (बक्कल क्रमांक ३८२) करीत आहेत. तर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही महिला पोलीस कर्मचारी निलीमा जाधव (बक्कल क्रमांक ८३१) यांनी केली आहे..



