ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कन्हाळगाव अभयारण्यासाठी पर्यावरणवादी “निसर्ग सखा”ची आग्रही भूमिका

वृक्षलागवाडीचा विश्वविक्रम करणाऱ्या मुनगंटीवारांचा विरोध का.? ; दिपक वांढरे यांचा पत्रपरिषदेतून सवाल 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

 गोंडपिपरी :- तालुक्यातील कन्हाळगाव अभयारण्याच्या वनक्षेत्र हस्तांतरणाची प्रक्रिया महिण्याभरात पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. २६ ऑक्टोबर रोजीच्या वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना ही सूचना दिली. असे असताना मात्र ३३ कोटी वृक्ष लागवडीचा विश्वविक्रम करून पर्यावरणाचा संदेश देणारे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आज कन्हाळगाव अभयारण्याच्या विरोधात का ? असा प्रश्न गोंडपिपरीत रविवारी (दि.१५) पार पडलेल्या पत्र परिषदेत निसर्गसखा संस्थेचे दिपक वांढरे यांनी विचारला आहे.

 गोंडपिपरी तालुका सध्या विविध समस्यांनी त्रस्त आहे. भविष्यात होणारी औद्योगिक क्रांती, तुमडीहेटी सिंचन प्रकल्प यामुळे लोक आधीच भयभीत असून पर्यावरणाची मोठी हानी याद्वारे होणार आहे. अशावेळी कन्हाळगाव अभयारण्यासारख संरक्षित जंगल तालुक्यात असणे अत्यंत गरजेचे असलेले मत पत्रपरिषदेत बोलताना दिपक वांढरे यावेळी यांनी व्यक्त केले.

गोंडपिपरी तालुक्यातील कन्हाळगाव अभयारण्य मध्य भारतातील वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचे क्षेत्र मानले जाते. मार्च २०२१ मध्ये या संदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध झाली होती. महाराष्ट्रसह तेलंगाना आणि छत्तीसगड मधील वनक्षेत्राशी असलेला पर्यावरणीय संबंध, वाघाच्या भ्रमणांसाठी उपलब्ध अधिवास आणि जैवविविधता यामुळे या क्षेत्राचे महत्त्व वाढले आहे. वाघांच्या दीर्घकालीन संरक्षणासाठी सलग वनक्षेत्र आणि सुरक्षित भ्रमणमार्ग आवश्यक असतात.

अशा क्षेत्रांमध्ये अधिवासाचे संरक्षण, शिकारीच्या घटनांवर नियंत्रण, वन्य प्राण्यांच्या हालचालीचे निरीक्षण आणि मानवी हस्तक्षेपाचे नियमन महत्त्वाचे ठरते. वन्यजीव विभागाकडे व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवल्यास या उपायायोजनांचे नियोजन अधिक सुसंगतपणे करता येऊ शकते, अशी भावना यावेळी निसर्गसखा संस्थेचे अध्यक्ष दिपक वांढरे यांनी व्यक्त केली.

ग्रामस्थांच्या मर्जी शिवाय कन्हाळगाव अभयारण्य होऊ देणार नाही, असे म्हणणारे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार हे कन्हाळगावपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या करंजी एमआयडीसी विषयी गप्प का? असा प्रश्न यावेळी दिपक वांढरे यांनी विचारला. गोंडपिपरी तालुक्यात प्रस्तावित करंजी एमआयडीसीला सर्वच ग्रामस्थांचा विरोध आहे, असे असताना प्रशासनाची उद्योग उभारणीसाठी एवढी धडपड कश्यासाठी?, हा सवाल देखील यावेळी वांढरे यांनी उपस्थित केला.

सह्याद्रीला विरोध करणाऱ्या मुनगंटीवारांनी कन्हाळगाव अभयारण्याच्या विरोधात घेतलेली “यु – टर्न” चिंतन करायला लावणारी असून कन्हाळगावच्या बाबतीत सर्वच प्रक्रिया पूर्ण करून वन्यजीव विभागाकडे व्यवस्थापन तातडीने सोपविण्यात यावे, अशी मागणी पर्यावरणवादी दिपक वांढरे यांनी पत्र परिषदेतून केली आहे.

*…..तर ही गुरुदक्षिणा ?*

गोंडपिपरीत होणाऱ्या औद्योगिक क्रांतीला कन्हाळगाव अभयारण्य आडकाठी ठरू शकते, अशी तर परीस्थिती नाही ना ? यातूनच कन्हाळगाव अभयारण्य रद्द करून औद्योगिकरणाला मार्ग मोकळा करून द्यायचा. म्हणजे शिष्याला गुरुदक्षिणा देण्याचा मानस तर नाही ना? अशी शंका यावेळी पत्र परिषदेत वांढरे यांनी व्यक्त केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये