भगवान बिरसा मुंडा यांचा संघर्ष आणि विचार संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी – आ. जोरगेवार
नकोडा येथे भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रम, आदिवासी समाजाच्या हक्क, शिक्षण आणि विकासासाठी एकजुटीने पुढे येण्याचे आवाहन

चांदा ब्लास्ट
क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांनी अन्याय आणि शोषणाविरोधात दिलेला लढा हा केवळ एका समाजापुरता मर्यादित नव्हता, तर तो जल, जंगल आणि जमिनीवरील हक्कांसाठीचा स्वाभिमानाचा संघर्ष होता. अत्यंत कमी वयात त्यांनी ब्रिटिश सत्तेविरोधात उभारलेला लढा, आदिवासी समाजाच्या अस्मितेसाठी केलेले कार्य आणि समाजाला दिलेली एकजुटीची शिकवण आजही प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. भगवान बिरसा मुंडा यांचे विचार आणि संघर्ष नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासोबतच आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, संघटन आणि सामाजिक जागृतीला प्राधान्य देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त जय सेवा सल्ला शक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने नकोडा येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहात आयोजित प्रबोधनात्मक कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे महामंत्री नामदेव डाहुले, भाजप तालुकाध्यक्ष विनोद खेवले, ममता मोरे, नकोडा सरपंच किरण बांदुरकर, ऋशी कोवे, विकास मडावी, मंगला उईके, राहुल कन्नाके, प्रणय कांबळे, ममता उरकुडे, आकाश गेडाम, रोषणी गेडाम, मंगेश राजगीडकर तनुश्री बांदुरकर, ममता उरकुडे आदिंची उपस्थिती होती.
यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले की, भगवान बिरसा मुंडा हे आदिवासी समाजाच्या स्वाभिमानाचे आणि संघर्षाचे प्रतीक आहेत. ब्रिटिश राजवटीतील अन्यायकारक धोरणे, शोषण आणि आदिवासींच्या परंपरागत अधिकारांवरील अतिक्रमणाविरोधात त्यांनी उभारलेला लढा इतिहासात अजरामर झाला आहे. जल, जंगल आणि जमीन हे आदिवासी समाजाच्या जीवनाचे अविभाज्य घटक आहेत. या नैसर्गिक साधनसंपत्तीवरील पारंपरिक हक्क आणि आपल्या संस्कृतीचे संरक्षण करण्यासाठी बिरसा मुंडा यांनी दिलेला लढा आजही आपल्याला अन्यायाविरोधात उभे राहण्याची प्रेरणा देतो.
आदिवासी समाजाचे देशाच्या इतिहासात, संस्कृतीत आणि स्वातंर्त्यलढ्यात मोठे योगदान आहे. मात्र, या समाजाच्या योगदानाची आणि महान परंपरेची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. आदिवासी समाजाची संस्कृती, रूढी-परंपरा आणि अस्मिता जपत आधुनिक विकासाच्या प्रवाहातही समाजाने पुढे गेले पाहिजे. यासाठी शिक्षण हे सर्वात प्रभावी माध्यम असून प्रत्येक कुटुंबाने आपल्या मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य द्यावे. शिक्षणातूनच नव्या संधी निर्माण होतील आणि समाजातील तरुण पिढी सक्षम होईल, असेही त्यांनी सांगितले.
आदिवासी बांधवांचे हक्क, त्यांना मिळणार्या शासकीय योजनांचा लाभ, रोजगाराच्या संधी आणि शिक्षणाच्या सुविधा यासाठी समाजाने जागरूक राहणे गरजेचे आहे. समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या समान संधी मिळाल्या पाहिजेत. त्यासाठी सामाजिक एकजूट, संघटन आणि जागृती महत्त्वाची आहे. भगवान बिरसा मुंडा यांनी दाखविलेल्या संघर्षाच्या मार्गातून प्रेरणा घेत समाजाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे, असे आवाहनही आमदार जोरगेवार यांनी केले.
भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अशा प्रबोधनात्मक कार्यक्रमांमधून महापुरुषांचे विचार समाजापर्यंत पोहोचतात आणि नव्या पिढीला आपल्या इतिहासाची जाणीव होते. त्यामुळे अशा उपक्रमांचे आयोजन सातत्याने होणे आवश्यक असल्याचेही ते यावेळी म्हणाले. सदर कार्यक्रमाला समाज बांधव अणि गावक-यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



