राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनाच्या अध्यक्षपदी एड. पारोमिता गोस्वामी यांची निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समिती आणि तेलंगण स्टेट मधील श्रीगुरुदेव सेवा मंडळ गोयेगाव, निशानी, सावरखेडा, खैरी,सांगवी शाखांच्या संयुक्त विद्यमाने गोयेगाव (मंडल -केरामेरी), जि.आसिफाबाद (तेलंगण स्टेट) येथे राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलन येत्या दि. ७ व ८ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आले आहे. समितीचे हे २० वे दोन दिवसीय संमेलन असून गोयेगाव च्या जि.प. शाळेच्या प्रांगणात होणार आहे.
स्थानिक सर्व ग्रामस्थ,युवक व महिला मंडळाच्या सहकार्याने सदर संमेलन होत असून या संमेलनाच्या अध्यक्षपदी चितेगाव (मुल) येथील सुप्रसिध्द समाजसेविका तथा लेखिका, विचारवंत एड. पारोमिता गोस्वामी यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रसंत साहित्य दिंडी, उद्घाटन समारंभ, विशेष पुरस्कार वितरण, ग्रामगीतावर आधारित परिसंवाद, प्रबोधन संध्या, खंजिरी कीर्तनाचा कार्यक्रम, ध्यानपाठ व सामुदायिक प्रार्थना, योग प्राणायामपर मार्गदर्शन, स्वच्छता अभियान, श्रमदान, ओवीसंबधाने स्वअनुभवकथन, समारोप आदी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.
संमेलनात राष्ट्रसंत साहित्याचे अभ्यासक, प्रबोधनकार, लोक कलावंत मंडळी, प्रचारक, लेखक सहभागी होणार आहेत.
संमेलन स्थळ गोयेगाव हे के.बी. आसिफाबाद (तेलंगण स्टेट) जिल्ह्यात असून आसिफाबाद – केरामेरी – आदिलाबाद या मार्गावर आहे.
संमेलनाध्यक्षपदी निवड झालेल्या पारोमिता गोस्वामी या कायद्याच्या पदवीधर असून सामाजिक कार्य विषयात एम.ए.पदवी त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबईतून पूर्ण केले आहे.
त्या श्रमिक एल्गार या असंघटित ग्रामीण मजुरांची ट्रेड युनियन च्या संस्थापक अध्यक्ष आणि एल्गार प्रतिष्ठान सामाजिक संस्थेच्या संस्थापक सचिव आहेत .
त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीच्या चळवळीचे नेतृत्व केले होते परिणामी २०१५ ते २०२० दरम्यान या जिल्ह्यात दारूबंदी झाली होती. वनजमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न शासनदरबारी मांडले, हजारो वनहक्क धारकांना वैयक्तिक वनहक्क दावे मिळण्यासाठी प्रयत्न केले तसेच ५०० आदिवासींना त्यांच्या हक्काची शेतजमीन मिळवून दिली. पारंपरिक आदिवासी बांबू बुरुड कामगार यांना बांबू व वनहक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.गडचिरोलीतील पोलिस चकमकीत ठार झालेल्या माडिया जमातीतील युवक चिन्ना मत्तामी यांच्या कुटुंबाला नागपूर उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यास मदत केली व सर्वोच्च न्यायालयात यशस्वी प्रतिनिधित्व केले. ग्रामीण मजूर, विशेषतः महिला मजूर, किमान वेतन, वेळेवर वेतन व सामाजिक सुरक्षा योजना (विधवा व वृद्धापकाळ निवृत्तीवेतन) मिळवून देण्यासाठी संघटन केले. चंद्रपूर कारागृहातील गर्दीबाबत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे अहवाल सादर केला.
पुनर्वसित पूर्व बंगाली समुदायांना शिक्षण व जमीन हक्कांसाठी संघटित केले.व्हिजिटिंग फेलो, राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्था (NIRD), हैदराबाद,येल वर्ल्ड फेलो, येल विद्यापीठ,आयझनहावर फेलो, अमेरिका,अशोका फेलो, बेंगळुरू अशा प्रतिष्ठित फेलोशिप त्यांना मिळाली आहे. त्यांना आजवर डॉ. जे. एम. कुमारप्पा पुरस्कार, कालिदास एम. शहा फील्डवर्क शिल्ड व प्रा. ग्रेस मॅथ्यू फील्डवर्क शिल्ड,लीला वाडिया पुरस्कार ,जनमंच जनगौरव पुरस्कार, महात्मा गांधी पुरस्कार, कमलताई होस्पेट संस्थापिका पुरस्कार आदी प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांची सामाजिक, लघुकथा, अनुवादित असे एकूण तीन ग्रंथ प्रकाशित असून त्यांना साहित्य क्षेत्रातील रमा मेहता रायटिंग ग्रँट पुरस्कार मिळाला आहे.तसेच त्यांचे अनेक महत्त्वाच्या सामाजिक विषयांवर आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये रिसर्च पेपर प्रसिद्ध झाले आहे.
त्यांच्या निवडीबद्दल राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्या वतीने तसेच श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.



