जळ पिंपळगाव येथे हिंदू संमेलन संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
संघ शताब्दी निमित्ताने मंगळवार दिनांक १८ मार्च २०२६ रोजी सायंकाळी पाच वाजता सकल हिंदू समाजातर्फे देऊळगाव राजा तालूक्यातील जळ पिंपळगाव गावातील श्री हनुमान मंदिर या ठिकाणी भव्य असे विशाल हिंदू संमेलन संपन्न झाले. या हिंदू संमेलनासाठी संत श्री वैष्णवगड अनूषंगीक हरिभक्त परायण श्री रमेशमहाराज जायभाये तथापि मातृशक्ती म्हणून देऊळगावराजा येथील सौ. अर्चना विवेक रामपूरकर आणि रा. स्व. संघांचे विभाग बौद्धिक प्रमुख माननीय श्री अभिजितजी नेटके हे प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होते. हिंदू संमेलनाचे संपूर्ण संयोजन श्री हरिदासजी वाघ यांनी केले तर जळ पिंपळगावयेथील सकल हिंदू समाजाने आयोजनासाठी अथक परिश्रम घेतले.
हिंदू संमेलनाच्या सुरुवातीला संमेलन स्थळी सुरेल अशा भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वारकरी मंडळींनी जळगाव आणि पिंपळगाव वस्ती मधून टाळ मृदंगाच्या गजरात भजन गात दिंडी काढली. आणि गावातील समस्त हिंदू बंधू-भगिनींना हिंदू संमेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन केले. यामध्ये गायक कलाकारांनीही उत्तमोत्तम अशा गीतांचे सादरीकरण केले. प्रसंगी कुमारी धनश्री ईप्पर हिने प्रभू रामचंद्राचे सुरमई गीत गाऊन वातावरण मंत्रमुग्ध केले तर प्रतिभा निकाळजे हिने ओवी गाऊन वातावरणामध्ये भाऊकता भरली.
हिंदू संमेलनाच्या सुरुवातीस हरिभक्त परायण रमेश महाराज जायभाये, सौ अर्चना विवेक रामपूरकर आणि माननीय श्री अभिजीतजी नेटके यांचे हस्ते गोमातेचे पूजणानंतर भारतमातेच्या प्रतिमेचा प्रतिमेचे व छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचेही पूजन करण्यात आले.
संमेलनामध्ये सर्वप्रथम संत हरिभक्त परायण रमेशमहाराज यांनी आपले आशीर्वचनांमध्ये हिंदू बांधवांना आपल्या सुरेल मधुर वाणीतून भारतीय संस्कृतीचे प्रत्यक्ष दर्शन करून दिले. हिंदू बांधवांना आवाहन करताना आपण सर्वांनी आपल्या धर्माचे धार्मिक अधिष्ठान जोपासले पाहिजे. धार्मिक अधिष्ठानाचे जतन करतांना आपण प्रभू श्रीरामचंद्र यांनी जसे आचरण केले, तसे वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आशिर्वचनामध्ये त्यांनी रामाचे वाली सोबतचे युद्ध आणि त्यावेळचा प्रसंग कथन करताना वालीने केलेल्या दुष्कृत्याबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण केली दुष्कृत करणाऱ्यांचा नेहमी अंतच होतो, हे त्यांनी आवर्जून त्या ठिकाणी स्पष्टपणे कथन केले. समाजाप्रती आपले आचरण अत्यंत उपयुक्त आणि सद्भभाव आणि सामाजिक समरसता वाढीसाठी असावे, यासाठी त्यांनी आग्रही भूमिका मांडली. आपली भारतीय संस्कृती आपल्या भारतीय परंपरा यांचा अवलंब करण्यासंबंधी संवाद साधला. संघ शताब्दी निमित्ताने हे हिंदू संमेलन होत आहे, तेवढ्यावरच फक्त न थांबता भारतातील सकल हिंदूंनी नेहमीच एकत्र राहण्यासाठी आपण अशा प्रकारची संमेलने वारंवार घेतली पाहिजे, असे विचार व्यक्त केले. भारताच्या प्रगतीसाठी भारताच्या उन्नतीसाठी सकल बांधवांनी पुरेपूर प्रयत्न केले पाहिजे. राष्ट्रीय भावना नेहमी जागृत ठेवून राष्ट्राच्या संपत्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी सर्व नागरिकांनी घेतली पाहिजे, असे प्रतिपादन केले.
जीवनामध्ये उत्तमोत्तम मार्ग स्वीकारून समाजाच्या उन्नतीचा विचार मनी बाळगावा, आपण हिंदू म्हणून आपली ओळख कदापिही विसरता कामा नये, आपली ओळख जगाला पटेल अशा गोष्टींवर आपण भर दिला पाहिजे असे विचार व्यक्त केले.
त्यानंतर महिला वक्त्या सौ. अर्चना रामपूरकर यांनीही महिलांना आवाहन करताना आपल्या मार्गदर्शनातून संपूर्ण महिलांची मने जिंकली. कुटुंबामध्ये संस्काराचे माहेरघर म्हणजे स्त्रिया असून स्त्रियांकडूनच कुटुंबामध्ये मुलामुलींना संस्कार मिळत असतात. म्हणून मुलामुलींच्या संस्काराकडे स्त्रियांनी आजच्या आधुनिक युगातही पूर्वीपेक्षा अधिक लक्ष देणे किती गरजेचे आहे, याचे महत्त्व त्यांनी अनेक छोट्या छोट्या उदाहरणातून विशद केले. आजकाल मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत जीकीरीचा झालेला असून मुलींना बालपणीच त्यांच्या सुरक्षा, निकोप स्पर्श आणि नकोसा स्पर्श हा कसा ओळखावा, याबद्दलही विस्तृत मार्गदर्शन केले. त्यांनी बालिकांनाही विशेष असे आवाहन करताना स्त्रिया आणि मुलींनी शोभेचा अंगभर वेश परिधान करणे, कपाळावर गंध असणे, भारतीय परंपरांची जपणूक करणे, एक स्त्री म्हणून जगासमोर अत्यंत पूरक सांस्कृतिक वेषात उपस्थिती दर्शवणे, समाजाच्या दृष्टीने निकोप असे वर्तन करणे, याबद्दल मार्गदर्शन केले.
रा. स्व. संघांचे विभाग बौद्धिक प्रमुख माननीय श्री अभिजीतजी नेटके यांनी संघ शताब्दीच्या निमित्ताने संघाचा शंभर वर्षाचा प्रवास अत्यंत कसबी शैलीतून प्रतिपादन केला. संघाचा हा संपूर्ण प्रवास करताना संघाला सातत्याने तिटकारा, असहकार्य, विरोध, तुरुंगवास, आणि अपयश अशा अनेक माध्यमातून पुढे जावे लागले याचाही आलेख त्यांनी या ठिकाणी उपस्थितांसमोर मांडला. उपस्थितांना त्यांनी आपले हिंदुराष्ट्र टिकले पाहिजे, त्याचे अस्तित्व टिकण्यासोबतच प्रगती ही साधली गेली पाहिजे, यासाठी आपण सर्वांनी एकजूट राहणे, एकत्र येणे किती गरजेचे आहे हे आवर्जून सांगितले. सोबतच त्यांनी सांघिक पद्धती, शाखेमध्ये चालणारे उपक्रम, ज्यायोगे स्वयंसेवकांचे मन शरीर यांची जडणघडण कशी केली जाते ,याची कार्यपद्धती समजावून दिली. संघाच्या शाखेमध्ये खेळ, दंड, योग, प्राणायाम, अनुशासन ह्यामधून व्यक्ती निर्माण कसे होत आहे, हे त्यांनी आपल्या अमूल्य विचारातून प्रगट केले. संघशताब्दी साजरी करताना अत्यंत गाजावाजा न करता पंच परिवर्तनातून समाजामध्ये बदल घडवून आणण्याची सांगायची कल्पना त्यांनी विशद केली सोबतच भाषा, भूषा, भ्रमण, भवन, भोजन, आणि भजन ह्या शटसूत्री हे महत्त्व त्यांनी प्रतिपादन केले.
हिंदू संमेलनाच्या निमित्ताने असंख्य स्त्रिया आणि पुरुष बालक बालिकांसह उपस्थित होते. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन आणि उपस्थित पाहुणे तथा उपस्थित बंधू-भगिनी श्रोते यांचे आभार प्रदर्शन सचिन काकड यांनी केले सूत्रसंचालन करताना त्यांनी भारताचे स्वातंत्र्य चिरकाल अबाधित राहण्यासोबतच सशक्त व्यक्तीनिर्माणाची निःपृह कामना करुन उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमांनंतर सर्वांना प्रसाद वितरीत करण्यात आला व कार्क्रमाची सांगता करण्यात आली.



