ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिवतीच्या शेतकऱ्यांच्या फार्मर आयडीचा प्रश्न ऐरणीवर

आमदार देवराव भोंगळेंचे आश्वासन; १५ ते २० दिवसांत प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- जिवती तालुक्यातील पात्र शेतकरी केवळ फार्मर आयडीच्या तांत्रिक अडचणीमुळे अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नयेत, यासाठी फार्मर आयडीची अट शिथिल करून ऑफलाइन अथवा पर्यायी पडताळणीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शब्बीर सय्यद (जागीरदार) यांनी केली. याबाबतचे निवेदन शनिवारी भाजपा जनसंपर्क कार्यालय, जिवती येथे आयोजित जनता दरबारात राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगळे यांना देण्यात आले.

जिवती तालुका हा दुर्गम व आदिवासीबहुल भाग असल्याने अनेक शेतकऱ्यांकडे अद्याप ऑनलाइन सातबारा उपलब्ध नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे फार्मर आयडी तयार करताना अडचणी निर्माण होत असून, कर्जमाफी योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांनाही केवळ ऑनलाइन प्रक्रियेतील तांत्रिक अडथळ्यांचा फटका बसण्याची शक्यता आहे.

‘ऑनलाइन नोंद नाही म्हणून कर्जमाफी नाही’, अशी वेळ पात्र शेतकऱ्यांवर येऊ नये, यासाठी शासनाने जिवतीसारख्या दुर्गम भागातील वस्तुस्थितीचा विचार करावा. फार्मर आयडीची सक्ती शिथिल करून ऑफलाइन किंवा पर्यायी पडताळणी प्रक्रिया तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

‘१०० टक्के पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळवून देणार’

निवेदन स्वीकारताना आमदार देवराव भोंगळे यांनी फार्मर आयडीच्या प्रश्नावर यापूर्वीच प्रयत्न सुरू केल्याचे स्पष्ट केले. “मी दोन दिवस अगोदरच यासाठी प्रयत्न केले आहेत. जिवती तालुक्यातील १०० टक्के पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. पुढील १५ ते २० दिवसांत फार्मर आयडीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी कार्यवाही केली जाईल,” असे आश्वासन आमदार भोंगळे यांनी दिले.

आमदारांच्या आश्वासनामुळे फार्मर आयडीच्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, या आश्वासनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी आणि कशा पद्धतीने होते, याकडे आता जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

कर्जमाफीसारख्या महत्त्वाच्या योजनेचा लाभ देताना कागदपत्रे, ऑनलाइन नोंदी किंवा तांत्रिक अडचणी पात्र शेतकऱ्यांच्या हक्काच्या लाभाच्या आड येऊ नयेत, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. येत्या १५ ते २० दिवसांत फार्मर आयडीचा प्रश्न मार्गी लागल्यास तालुक्यातील हजारो पात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

फार्मर आयडीच्या प्रश्नावर तातडीने ठोस निर्णय घेऊन एकही पात्र शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शब्बीर सय्यद (जागीरदार) यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये