शास. औ. प्र. संस्थेत रासेयोच्या श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन
रासेयो शिबिरातून नवयुवकांत श्रम व सेवेच्या संस्काराची प्रभावी रूजवणूक - प्रा. डॉ. कुलदीप गोंड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
ऋषी अगस्त शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन संस्थेच्या परिसरात करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन सरदार पटेल महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. कुलदीप गोंड यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य गजानन राजुरकर होते. राष्ट्रीय सेवा योजनेचे सल्लागार बंडोपंत बोढेकर, कार्यक्रम अधिकारी आर.पी. श्रीरामे, उपकार्यक्रम अधिकारी महेश नाडमवार, गटनिदेशक हितेश नंदेश्वर आदींची उपस्थिती होती.
प्रास्ताविक गटनिदेशक आर. पी. श्रीरामे यांनी केले. तर बंडोपंत बोढेकर यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या आजवरच्या वाटचालीवर प्रकाश टाकला. यावेळी उद्घाटक डॉ. गोंड म्हणाले की, श्रमसंस्कार शिबिर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दिशादर्शक ठरत असते. नवयुवकांत श्रम संस्कार, समाजसेवेची भावना वाढीस लागावी, ग्रामविकासात त्यांचा सहभाग असणे आवश्यक असल्याचे मत यावेळी डॉ. गोंड यांनी मांडले.
अलिकडे युवकांमध्ये व्यक्तिमत्व विकास, नेतृत्वगुण, आत्मविश्वास, शिस्त यासोबतच स्वावलंबनाची भावना निर्माण करण्याची गरज आहे, राष्ट्रीय सेवा योजना हे त्यासाठी प्रभावी व्यासपीठ आहे, असे प्राचार्य गजानन राजुरकर म्हणाले.
सूत्रसंचालन निदेशक पियुष केने यांनी केले तर आभार प्रदर्शन निदेशक श्री. किशोर इरदंडे यांनी केले. दुसऱ्या सत्रात स्वयंरोजगार विषयावर गटनिदेशक हितेश नंदेश्वर यांनी मार्गदर्शन केले आणि त्यांनी शासनाच्या विविध योजना समजावून दिल्यात. तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात एस.पी. आफिस मधील सायबर सेल चे सायबर एक्सपर्ट मुजावर अली यांनी इंटरनेट, सायबर क्राईम समजावून सांगितले. संस्थेच्या वतीने श्री. अली यांना गटनिदेशक बंडोपंत बोढेकर यांनी सन्मानित केले.
यावेळी श्री. अली म्हणाले की, सायबर सिक्युरिटी म्हणजे संगणक, मोबाईल, नेटवर्क, इंटरनेटवरील माहिती आणि सिस्टीम यांना हॅकिंग, व्हायरस, डेटा चोरी यांसारख्या धोकेपासून सुरक्षित ठेवण्याची प्रक्रिया होय.
सायबर सिक्युरिटी ही अशी तंत्रज्ञान, पद्धती आणि नियमांची प्रणाली आहे जी आपली वैयक्तिक माहिती संगणक व नेटवर्क,ऑनलाइन व्यवहार यांना सुरक्षित ठेवते.
आजकाल सर्व माहिती इंटरनेटवर असते. हॅकर्स ती चोरण्याचा प्रयत्न करतात.
व्यवसाय व संस्थांची सुरक्षा
कंपन्यांचा महत्त्वाचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी सायबर सिक्युरिटी आवश्यक आहे. सोशल मीडियाचा सुरक्षित वापर करावा.
हॅकिंग,व्हायरस, मालवेअर फिशिंग ,डेटा चोरी टाळण्यासाठी अज्ञात लिंकवर क्लिक करू नका.अँटीव्हायरस वापरा.
सायबर सिक्युरिटी म्हणजे आपल्या डिजिटल जीवनाचे रक्षण करणारी ढाल आहे, असे श्री .अली म्हणाले. दुसऱ्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रमात संस्थेच्या प्रशिक्षणार्थांनी विविध नृत्याविष्कार सादर केले. एकल नृत्य , एकल गीत गायन, समुह नृत्य आदी कला प्रदर्शन यावेळी करण्यात आले. भारूडकार सोनाली आंबेकर यांनीही यावेळी स्वयंस्फूर्तीने आपला एकपात्री कार्यक्रम सादर करून शिबिरात रंगत आणली. सूत्रसंचालन कु. मारिया उराडे यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्यक्रम अधिकारी आर. पी. श्रीरामे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्वच गटनिदेशक, निदेशक व कर्मचारी वृंदानी अथक परिश्रम घेतले.



