अल्पवयीन दुचाकी चालकांच्या पालकांचे समुपदेशन व मार्गदर्शन
गोंडपिपरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांचा स्त्यूत उपक्रम.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :- रस्ता अपघातांना आळा घालणे तसेच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे, या उद्देशाने गोंडपिंपरी पोलीस ठाण्याच्या वतीने आज (दिनांक ७ ऑगस्ट) रोजी अल्पवयीन दुचाकी चालकांच्या २० पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांचे समुपदेशन व मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी पालकांना अल्पवयीन मुला-मुलींना कोणत्याही परिस्थितीत वाहन चालविण्यास देऊ नये, वाहतूक नियमांचे पालन करण्याचे महत्त्व, विनापरवाना वाहन चालविण्यामुळे होणारे धोके तसेच अशा प्रकरणांमध्ये पालक व वाहनधारकांवर लागू होणाऱ्या कायदेशीर तरतुदी, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
तसेच, अल्पवयीन मुलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही पालकांची असल्याने त्यांना वाहन चालविण्यास परवानगी देऊ नये, दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करण्याबाबत जागरूकता निर्माण करावी तसेच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याची सवय मुलांमध्ये रुजवावी, असे आवाहन करण्यात आले.
यापुढे अल्पवयीन व्यक्ती वाहन चालविताना आढळल्यास संबंधित वाहनधारक व पालकांविरुद्ध प्रचलित मोटार वाहन कायद्यानुसार आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
गोंडपिंपरी पोलीस ठाण्यामार्फत रस्ता सुरक्षा व वाहतूक नियमांबाबत जनजागृतीसाठी अशा प्रकारची मोहीम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांनी सांगितले.



