बोरगावात २८ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या…
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा :_ शहरालगतच्या बोरगाव परिसरातील गणपती मंदिराजवळ एका २८ वर्षीय युवकाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत युवकाचे नाव अनिकेत अरविंद गोडाम (वय २८) असून तो बोरगाव, वर्धा येथील वॉर्ड क्रमांक २, गणपती मंदिर परिसरात राहत होता. तो टाटा मोटर्समध्ये मेकॅनिक म्हणून काम करीत असल्याची माहिती तक्रारीत नमूद आहे.
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत काही दिवसांपासून तणावात असल्याचे सांगण्यात आले. ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी त्याचा भाऊ कामावर असताना जवळ राहणाऱ्या नातेवाईकाचा फोन आला. अनिकेतने खोलीत गळफास घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्याला उपचारासाठी सामान्य रुग्णालय, वर्धा येथे नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणी पोलिस ठाण्यात माहिती देण्यात आली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.



