गुढीपाडवा म्हणजे शौर्य, स्वाभिमान, संस्कृती आणि नव्या आशांचा उत्सव – आ. जोरगेवार
भाजपाच्या वतीने गुढी उभारून विजय, समृद्धी आणि नवचैतन्याचा संदेश

चांदा ब्लास्ट
गुढीपाडवा हा आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि नवचैतन्याचा सण आहे. नवीन वर्षाची सुरुवात आपण आनंद, उत्साह आणि सकारात्मकतेने करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी विचारांनी प्रेरित हा गुढीपाडव्याचा सण आपल्या शौर्य, स्वाभिमान आणि संस्कृतीचे प्रतीक असून गुढी उभारून आपण विजय, समृद्धी आणि नव्या आशांचा संदेश देत असतो, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
हिंदू नववर्षाच्या स्वागताचा सोहळा म्हणून ओळखला जाणारा गुढीपाडवा उत्सव यंदाही चंद्रपूरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. या प्रसंगी गुढी उभारून उपस्थित नागरिकांना घुगरी वाटप करण्यात आले. यावेळी ब्रह्मास्त्र ढोल-ताशा पथकांनी कार्यक्रमात रंगत भरली. तसेच जगनगुरु व्यायामशाळेच्या वतीने कुस्ती आणि लाठी-काठीची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने या अभूतपूर्व सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महापौर संगीता खांडेकर, परमपूज्य मनीष महाराज, भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिर, मनपा गटनेते चंद्रशेखर शेट्टी, ज्येष्ठ नेते राजेंद्र खांडेकर, तुषार सोम, बलराम डोडानी, महामंत्री रवी गुरनुले, वंदनाताई हातगावकर, विनोद शेरकी, नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, भालचंद्र दानव, आशिष मासीरकर, गणेश पिंपळकर, नगरसेविका शीतल गुरुनुले, अॅड. सारिका संदुरकर, अनुजा तायडे, आशा देशमुख, महिला महामंत्री सायली येरणे, विमल कातकर, स्वप्निल डुकरे, रामकुमार आकापेल्ली, राकेश नाकाडे, प्रवीण गिलबिले, मंगेश अहिरकर, सतीश तायडे, सुमित बेले, राजेश मोरपाका, नकुल वासमवार, प्रतीक शिवणकर, संजय महाकाले, ईश्वर विरूटकर, कल्पना शिंदे ईश्वर वाघमारे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार पुढे म्हणाले की, आज येथे मोठ्या जल्लोषात साजरा होत असलेला हा उत्सव आपल्या चंद्रपूरच्या एकतेचे आणि संस्कृतीप्रेमाचे द्योतक आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने दरवर्षी हा सोहळा साजरा केला जात आहे. अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे समाजामध्ये एकोपा वाढतो, तरुण पिढीला आपल्या परंपरांची ओळख होते आणि आपल्या संस्कृतीबद्दल अभिमान निर्माण होतो.
समाजातील प्रत्येक घटकाचा विकास होण्यासाठी आपण कटिबद्ध राहून एक सक्षम, सशक्त आणि समृद्ध चंद्रपूर घडविणे हेच आपले ध्येय असले पाहिजे. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यात प्रजेचे राज्य होते. त्यांच्या विचारांतून समाजाला नेहमी प्रेरणा मिळत राहावी, यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा आपण संकल्प केला असून त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे.
आज कलाकारांनी आपली पारंपरिक कला सादर करून गुढीपाडव्याला एक वेगळीच शोभा आणली आहे. अशा कला आणि परंपरांचे जतन करणे हे आपले कर्तव्य असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नागरिकांची मोठ्या संखेने उपस्थिती होती.



