गॅस दरवाढ व तुटवड्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन
गांधी चौकात २० मार्चला निदर्शने

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष तालुका गोंडपिपरीच्या वतीने देशातील वाढता गॅस सिलेंडर तुटवडा आणि सातत्याने होत असलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या विरोधात शुक्रवार, दिनांक २० मार्च रोजी दुपारी १.०० वाजता गांधी चौक येथे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
सध्या गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे घरगुती अर्थकारण कोलमडले आहे. ग्रामीण व शहरी भागात अनेक ठिकाणी गॅसचा तुटवडा जाणवत असून, महिलांना व कुटुंबांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. केंद्र सरकारकडून याबाबत कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात निषेध नोंदविण्यासाठी व जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. आंदोलनाद्वारे गॅस दरवाढ त्वरित कमी करावी, तसेच तुटवडा दूर करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात येणार आहे.
हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील नागरिक, महिला व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन काँग्रेस तालुका अध्यक्ष अशोक रेचनकर व शहर अध्यक्ष राजू झाडे यांनी केले आहे.



