सेलू शहरात अतिक्रमण हटाव मोहिमेचा धडाका
मुख्याधिकारी मैदानात, राजकीय पदाधिकाऱ्यांची मात्र दांडी!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेल्या सेलू शहराने आज मोकळा श्वास घेतला. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली आज, २ जानेवारी रोजी सकाळपासूनच शहरात धडक अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात करण्यात आली. विशेष म्हणजे, कोणतीही राजकीय ढवळाढवळ किंवा दबावाला बळी न पडता प्रशासनाने हे धाडसी पाऊल उचलल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
प्रशासनाचा प्रेमाचा मार्ग स्वीकारून मोहिमेच्या सुरुवातीला मुख्याधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा न घेता सामोपचाराची भूमिका घेतली. रस्त्यावर अतिक्रमण करून बसलेल्या व्यावसायिकांना आणि हातगाडी धारकांना स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले. “शहराच्या विकासासाठी आणि वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सहकार्य करा,” असे आवाहन प्रशासनाकडून प्रेमाने करण्यात येत होते.
एकीकडे मुख्याधिकारी आणि कर्मचारी रस्त्यावर उतरून काम करत असताना, नगरपंचायतीचा एकही पदाधिकारी या मोहिमेकडे फिरकला नाही. आगामी निवडणुका आणि ‘मतांच्या राजकारणामुळे’ पदाधिकाऱ्यांनी या मोहिमेपासून लांब राहणे पसंत केल्याची चर्चा शहरात रंगली आहे. आज हटवलेले अतिक्रमण उद्या पुन्हा राजकीय वरदहस्ताने जैसे थे होईल का? असा सवाल सामान्य नागरिक विचारत आहेत.
नगरपंचायत कार्यालयापासून सुरू झालेली ही मोहीम खालील मुख्य चौकांत राबवण्यात आली.
हे रस्ते रहदारीचे मुख्य केंद्र असल्याने येथे नेहमीच वाहतूक कोंडी होत असे. मात्र, या मोहिमेमुळे हा परिसर सध्या मोकळा होण्याचे चिन्ह दिसत आहे.
अतिक्रमणधारकांचा विरोध आणि ‘जागीरदारी’ची मानसिकता
मोहिमेदरम्यान काही ठिकाणी किरकोळ विरोधाचे स्वरही उमटले. अनेक वर्षांपासून रस्त्यावर ठाण मांडून बसलेले अतिक्रमणधारक त्या जागेला आपली ‘खाजगी मालमत्ता’ समजत असल्याने प्रशासकीय कारवाईला त्यांनी विरोध दर्शवला. यापूर्वीही अशा मोहिमा राबवल्या गेल्या, मात्र सातत्य नसल्याने २-४ दिवसात परिस्थिती पुन्हा पूर्ववत होते. त्यामुळे यावेळी ही कारवाई कायमस्वरूपी टिकणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या मोहिमेत मुख्याधिकारी अनुप अग्रवाल यांच्यासह अधीक्षक नितीन पाटील, पंकज आसेकर, अभियंता सागर बागुल, तुषार राठोड, शैलेश बेलोकर, हेमंत नाईकवाडे व इतर कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.



