विकासकामांच्या जोरावर चंद्रपूर महानगरपालिकेत महायुतीचा झेंडा फडकेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
माता महाकालीच्या आशीर्वादाने महायुतीचा महाविजय निश्चित – मुख्यमंत्री

चांदा ब्लास्ट
भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विजय संकल्प यात्रा
चंद्रपूर येथे भारतीय जनता पार्टीच्या सत्तेत विविध विकासकामे झाली असून शहराचा चेहरा-मोहरा बदलण्याचे काम आम्ही केले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक जनउपयोगी योजना आम्ही येथे यशस्वीपणे राबवित आहोत. आता १६ हजार घरांना कायमस्वरूपी पट्टे देण्याचा निर्णय झाला असून त्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. आजच्या या विजय संकल्प यात्रेतून विजयाचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. आम्ही केलेल्या विकासकामांच्या जोरावर आणि माता महाकालीच्या दर्शनाने चंद्रपूर महानगरपालिकेत महाविजय मिळणार असून येथे महायुतीचा झेंडा फडकेल , असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीतील सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य विजय संकल्प यात्रा काढण्यात आली. अंचलेश्वर गेट येथून निघालेल्या संकल्प यात्रेचा जटपूरा गेट येथे समारोप करण्यात आला. येथे कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. प्रा. अशोक उईके, राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, आमदार कीर्तिकुमार भांगडिया, आमदार देवराव भोंगळे, आमदार करण देवतळे, शिवसेनेचे पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव, जिल्हाप्रमुख अॅड. युवराज धानोरकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विकासाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टी निवडणुकीला सामोरे जात आहे. चंद्रपूर शहरात मागील काही काळात हंसराज अहिर, सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात विकास झाला आहे. चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकाली आणि पवित्र दीक्षाभूमीच्या विकासासाठी मोठा निधी आपण मंजूर केला आहे. पिण्याच्या पाण्याची योजना, भुयारी गटार योजना, रस्ते योजना, सुशोभीकरण योजना, प्रधानमंत्री आवास योजना अशा अनेक योजनांच्या माध्यमातून आपण या शहराचा सर्वसमावेशक विकास केला आहे. पुढेही ही विकासाची गाडी याच गतीने सुरू ठेवण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेत पारदर्शक सत्ता असणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहराच्या विकासासाठी ५० हजार कोटी रुपये देणार असल्याची घोषणा केली आहे. यात चंद्रपूर शहरालाही निधी देण्यात येणार आहे. त्यामुळे या निधीचा योग्यरीत्या वापर व्हावा यासाठी भाजपशिवाय पर्याय नाही. १५ तारखेला महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून देत चंद्रपूरच्या विकासाला अधिक गतीशील करण्याचे आवाहन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री यांनी महाकालीचे दर्शन घेत फोडला प्रचाराचा नारळ
राज्यभरात आजपासून सर्वच महानगरपालिकांच्या निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकालीचे दर्शन घेत भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे.
विविध ठिकाणी यात्रेचे स्वागत
अंचलेश्वर गेटजवळून निघालेल्या विजय संकल्प यात्रेचे विविध ठिकाणी स्वागत करण्यात आले. यावेळी अंचलेश्वर गेट येथे बेलदार समाज, ख्रिश्चन समाजाच्या वतीने पटेल हायस्कूल, सुदर्शन समाजाच्या वतीने छोटा बाजार चौक, मादगी समाजाच्या वतीने हसन इलेक्ट्रिक, क्षत्रिय राजाभोस बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने वसंत भवन, उत्तर भारतीय ब्राह्मण समाजाच्या वतीने लक्ष्मी नारायण मंदिर, फुलमाळी समाजाच्या वतीने चंद्रहास लॉज, खैरे कुणबी समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक, भोई समाजाच्या वतीने छोटा बाजार, सुतार समाजाच्या वतीने श्री संतोषी माता मंदिर, बंगाली समाज संघटनेच्या वतीने आराधना ड्रेसेस, शिवभोजन संघटनेच्या वतीने अंचलेश्वर गेट, गुरुदेव सेवा समितीच्या वतीने गोपाल ट्रेडर्स, तेली समाजाच्या वतीने जटपूरा गेट, अनुसूचित जाती समाज संघटनेच्या वतीने अंचलेश्वर गेट, आदिवासी समाजाच्या वतीने गिरनार चौक, बोहरा समाजाच्या वतीने चांडक मेडिकल, आदिम माना समाजाच्या वतीने गांधी चौक, हलबा समाजाच्या वतीने पटेल हायस्कूल, मातंग समाजाच्या वतीने आंबेडकर चौक, महात्मा ज्योतिबा फुले आयोजन समितीच्या वतीने जटपूरा गेट येथे मुख्यमंत्री यांचे स्वागत करण्यात आले.



