मंगी (बूज) जि. प. शाळेत डिजिटल वर्गखोली व संगणक प्रयोगशाळेचे उत्साहात उद्घाटन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
शिक्षण क्षेत्रात डिजिटल सक्षमीकरणाला चालना देण्याच्या उद्देशाने अंबुजा सिमेंट कंपनीच्या सामाजिक उपक्रमांतर्गत जि. प. शाळा मंगी येथे नव्याने डिजिटल वर्गखोली व संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन बुधवार, दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता शिक्षक, विद्यार्थी, गावकरी यांच्या प्रचंड उत्साहात करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शंकर तोडसे होते.तर उद्घाटक म्हणून महेंद्रसिंग राठोड (युनिट हेड, मराठा सिमेंट वर्क्स) उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून वासुदेव चापले (उपसरपंच), मंगेश कोडापे (अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती), श्रीकांत कुंभारे (विभागीय व्यवस्थापक, अंबुजा फाउंडेशन), परसराम तोडसाम (अध्यक्ष, ग्रामविकास समिती), रामा पवार (केंद्र प्रमुख), कंपनीचे व्यवस्थापन अधिकारी, पत्रकार,शिक्षक, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अंबुजा सिमेंट कंपनीचे युनिट प्रमुख महेंद्रसिंग राठोड यांनी सांगितले की, डिजिटल वर्गखोली व संगणक प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षणाचा लाभ मिळेल. स्मार्ट बोर्ड, संगणक प्रणाली व डिजिटल शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व प्रभावी शिक्षण पद्धतीशी जोडले जाईल. हा उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल युगाशी जोडणारे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
अंबुजा फाउंडेशनचे प्रमुख श्रीकांत कुंभारे यांनी सांगितले की, कंपनीकडून शिक्षण, आरोग्य व सामुदायिक विकास क्षेत्रात सातत्याने काम केले जात आहे. जि. प. शाळा मंगी येथे राबविण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरेल.यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार सोहळा हे पार पडला
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या मुख्याध्यापकांनी अंबुजा कंपनीच्या सहकार्याबद्दल कंपनी प्रशासनाचे आभार मानले.



