भद्रातीच्या ग्रामोदय संघाची बिकट परिस्थिति : हस्तकलेला अखेरची घरघर
खादी ग्रामोद्योग आयोगा सह केंद्रीय लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाकडून हेंडसाळ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामोदय संघ भद्रावती रजि नंबर एफ.२५ (चांदा) स्थापना संस्थापक कृष्णमूर्ती मिरमीरा यांच्या पुढाकारातून १९५५साली करण्यात आली. ग्रामीण परंपरागत हस्तकलेला व स्थानिक कच्चा माल व परंपरागत कारागिरांना प्राधान्य देत भद्रावती येथे सात एकड जागेवर उभारणी करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सर्वोदयी विचार व आचरणा ना चालना देण्यात आली. स्थानिक कारागिरांच्या कलात्मकतेला, कौशल्याला, सृजनशीलतेला विशेष वाव देत कोणत्याही यांत्रिक उपकरणाशिवाय हस्तकलेला प्राधान्य देण्यात आले. स्थानिक हस्तकलेला देश विदेशात सातासमुद्रापार नेण्याचं मौलिक व महत्सप्राय कार्य असा या संघाचा अभिमाननीय पूर्व इतिहास आहे.
भारत सरकारच्या खादी ग्रामोद्योग आयोगाची स्थापना १९५६साली तर या संघाची स्थापना १९५५ साली करण्यात आली हे विशेष. सिमेंट काँक्रिट ची घरे अपवादात्मक होती त्या काळात चंद्रपूर जिल्ह्यात कवेलु कारखाने मोठ्या प्रमाणात होते, भद्रावती येथे किमान सव्वाशे तळे असल्याने इथल्या उच्च दर्जाच्या मातीचा उपयोग करीत कवेलु कारखाने भरभराटीस आली होती. संस्थापक कृष्णमूर्ती मिरमीरा यांनी भद्रावती येथील माती व कोठारी, नागपूर येथील चुना खाणी चा उपयुक्तता हेरून व स्थानिक कुंभारी कलेला व परंपरागत कारागिरांना प्राधान्य देत भारतभर प्रसिद्ध ग्रामोदय संघाची वाटचाल सुरु केली. मंगलोरी कवेलु विभाग, सिरॅमिक बरणी विभाग, कप बशी विभाग व प्रक्षीक्षण विभाग सुरू केले किमान स्थानिक ३५० कारागीर व कामगारांना हक्काचा रोजगार उपलब्ध करून दिला. मात्र १९७२ ते १९८० या काळात वनविभागाच्या खान बंद आदेशाने तद्वतच सिमेंट काँक्रिट घरामुळे तसेच यांत्रिक उपकरणे व प्लास्टिक च्या उदयामुळे ग्रामीण उद्योग व हस्तकला नामशेष होण्याची प्रक्रिया सुरू झाली.
स्व. मिरमीरा यांच्या निधनाने ग्रामोदय संघाचा डोलारा सांभाळणे अवघड होत गेले. कोरोना पूर्वी इथे जैन धर्माच्या भाविकांचा राबता असायचा त्यामुळे कलात्मक वस्तू विक्रीची बारा ते पंधरा लाख रुपयांची वार्षिक उलाढाल व्हायची. मात्र कोरोना काळापासून खरेदीदार कमी झाल्याने आज पन्नास ते साठ हजार रुपये उलाढाल होत असल्याने या संघापुढे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. एकंदरीत खर्च पाहता सात एकड परिसर, इमारती, खर्च, नगर परिषद भद्रावती चा वार्षिक कर नव्वद हजार रुपये, दरमहा बारा ते पंधरा हजार रुपये वीज बिल , पगार ,आदी खर्चाच्या मानाने उत्पादन व विक्री यात तफावत असल्याने संघाच्या संचालकापुढे आ वासून प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
२०२१ मध्ये केंद्रीय लघु व मध्यम उद्योग मंत्रालय मंत्री श्री. नितिन गडकरी यांनी भेट देऊन माध्यमात मोठा गाजावाजा करून वीस कोटी रुपये देण्याबाबत शिफारस केली होती. आता कुठे चांगले दिवस येतील ही आशा पल्लवीत होते न होते तर अवघ्या वीस दिवसात त्यांचे खाते बदलल्या गेले. तत्कालीन खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी दखल घेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कडे हा प्रश्न धरून ठेवला. या करिता संघाचे अध्यक्ष व्हि. सी. प्रकाश दिल्ली येथे तीन दिवस तळ ठोकून बसले मात्र फलित शून्य. लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाकडून निराशा व खुद्द खादी ग्रामोद्योग आयोगाने ही हात झटकले त्यामुळे पुढे कसे हा यक्षप्रश्न कार्यरत संचालकापुढे निर्माण झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या उदासीनतेमुळे भद्रावती शहराची शान मरणासन्न अवस्थेत पडली असून आजघडीला एकूण आठ प्रस्ताव शासन दरबारी धूळ खात पडले आहेत.
देशातील विदेशातील प्रशिक्षणार्थींना प्रक्षीक्षण देणाऱ्या या संघाला केंद्र सरकारने दुर्लक्षित केले असताना मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी विश्वकर्मा हि लोकप्रिय योजना राबवून या योजनेअंतर्गत उमेदवारास पाचशे रुपये प्रतिदिन देण्यात येते सोबतच यांत्रिक उपकरणे खरेदी करिता पंधरा ते वीस हजार आणि बँकेकडून अवघ्या पाच टक्के व्याजदरावर एक ते दोन लाख अर्थसहाय्य करण्याचा सपाटा सुरू आहे. जिथे गरज आहे अश्या सर्वोदयी विचार व परंपरा गत कौशल्य व कलेला जीवंत ठेवण्यासाठी झटणाऱ्या ग्रामोदय संघास ठेंगा दाखविल्या जाणे हा विरोधाभास असल्याचे संचालकांनी सांगितले.
स्फोटके तयार करणारी आयुध निर्माणि, प्रसिद्ध जैन मंदिर व ग्रामोदय संघ अशी भारतभर या शहराची ओळख आहे. विशेषतः स्थानिक कुंभारी हस्तकला जीवंत ठेवण्याचा प्रयत्न या संघाकडून केला जातो आहे मात्र केंद्र सरकारच्या उदासीन व दुर्लक्षित धोरणामुळे व असहकाराच्या भूमिकेमुळे इथले हे वैभव लयास जात आहे हि शोकांतिका आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावाचे गोडवे गाऊन सत्ता गाजवायची, एकीकडे भांडवलदार वर्ग मोठा करायचा तर दुसरीकडे गांधीच्या विचारातील ग्रामीण भारत व पारंपरिक हस्तव्यवसाय व हस्तकला तद्वतच ग्रामीण कारागीर यांची कला, कौशल्य, सृजनशीलतेला छेद देणारी केंद्रीय नीती प्रचंड विडंबन निर्माण करणारी आहे. यांत्रिक व आधुनिक युगात वैभवशाली ग्रामोदय संघाला शेवटची घरघर लागली आहे असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही.
मात्र संघाचे ७८ वर्षीय RTPC चे प्राचार्य राहिलेले विदेशात भारतीय हस्तकलेला पोहचविणारे अध्यक्ष व्हि. सी. प्रकाश यांनी स्व. कृष्णमूर्ती मिरमीरा यांची ही परंपरा कायम राखण्यास आम्ही कटिबद्ध असून जोपर्यत हयात आहोत तोपर्यंत हस्तकला व ग्रामोदय संघाला जीवंत तर ठेऊच आणि हि परंपरागत कला पुढच्या पिढीकडे नेऊ असे आत्मविश्वासाने सांगितले.
ग्रामोदय संघाच्या जडणघडणीत अध्यक्षासह उपाध्यक्ष श्यामराव ठाकूर, सचिव अय्युब हुसेन, सहसचिव सुरेश चांदेकर, सदस्य दत्तू गुंडावर, जितेंद्र कुमार चौधरी, प्रकाश वाणी, मीराबाई बुराडे, मंदाबाई कुळकर्णी यांचाही सिंहाचा वाटा असल्याचे दिसून आले.



