जिल्हयातील पोंभुर्णा आणि करंजी या एमआयडीसी मध्ये प्लग अॅन्ड प्ले या धर्तीवर आदिवासी औद्योगिक क्षेत्र विकसित करावे आ. सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत मागणी
याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन

चांदा ब्लास्ट
उच्चस्तरीय बैठक घेवून योग्य कार्यवाही करणार
चंद्रपूर जिल्हयातील पोंभुर्णा आणि गोंडपिपरी तालुक्यातील करंजी येथील एमआयडीसी मध्ये प्लग अॅन्ड प्ले या धर्तीवर आदिवासी औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यासाठी शासन निश्चीतपणे सकारात्मक विचार करेल. यापूर्वी नाशिक येथे अशा यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे. तोच प्रयोग चंद्रपूर जिल्हयातील या दोन एमआयडीसी मध्ये करण्यात येईल असे आश्वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभे दिले. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेदरम्यान उद्योग मंत्र्यांनी वरील आश्वासन दिले.
या अर्धा तास चर्चेदरम्यान बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, आपण स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा केला. मात्र आदिवासी युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी जलदगतीने प्रयत्न होताना दिसत नाहीत. चंद्रपूर जिल्हयातील आदिवासी तरूण तरूणींना उद्योजक बनविण्यासाठी आदिवासी औद्योगिक क्षेत्र निर्माण करणे आवश्यक आहे. आदिवासींचे उत्थान करण्यासाठी आपण विविध योजना राबवितो. मात्र आदिवासी तरूणांमधून उद्योजक तयार होताना दिसत नाहीत. चंद्रपूर जिल्हयाचे आदिवासी सुपुत्र क्रांतीवीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके हे ब्रिटीशांविरूध्द संघर्ष करताना शहीद झाल्याचा जाज्वल्य इतिहास आहे. मी अर्थमंत्री असताना चंद्रपूर जिल्हयातील आदिवासी तरूण-तरूणी आठ महिन्यांच्या प्रशिक्षणात मिशन शौर्य या अभियानाअंतर्गत माऊंट एव्हरेस्ट सारख्या शिखरावर चढले. देशाच्या पंतप्रधानांनी या युवकांचे आपल्या भाषणात कौतुक केले. आदिवासी तरूण प्रामामिक आहेत, शूर आहेत मग त्यांना संधी का दिली जात नाहीत, असा सवाल करत आदिवासी वसतीगृहांमध्ये लागणारे गणवेश व इतर वस्तु पुरविण्यासाठी आदिवासी संस्था, आदिवासी व्यक्ती यांना संधी देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
बल्लारपूर येथे रू.१२.५० कोटी निधी खर्चुन सुषमा स्वराज महिला सक्षमीकरण केंद्र तयार करण्यात आले आहे. अशाच पध्दतीने आदिवासींना कौशल्य विकासाची संधी उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकारच्या योजनांशी इंटीग्रेट करण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादीत केली. ट्रायबल को-ऑपरेटीव्ह मार्केटींग फेडरेशन च्या माध्यमातुन कृषी आधारित, वनआधारित उद्योग चंद्रपूर जिल्हयातील एमआयडीसी मध्ये स्थापन करण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले. चंद्रपूर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असल्यामुळे हा प्रयोग चंद्रपूर जिल्हयातील पोंभुर्णा आणि करंजी या एमआयडीसीमध्ये राबवावा व त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करावा, अशी मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली. यासंदर्भात लवकरच दोन्ही विभागांच्या सचिवांसह उच्चस्तरीय बैठक घेवून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले.


