नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत महत्त्वाचे प्रश्न मांडण्याची नागरिकांना मुभा द्यावी
माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक सुनील नामजवार यांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती नगर परिषदेच्या येणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या विषयसूचीवर शहरातील विविध नागरी व सार्वजनिक हिताच्या प्रश्नांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक सुनील नामजवार यांनी एका निवेदनाद्वारे नगर परिषदेचे मा. अध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
या निवेदनात सब्जी मार्केटलगत असलेल्या नगर परिषदेच्या गाळा क्रमांक २७/१ व २७/२ मध्ये सुरू असलेल्या देशी दारू दुकानास देण्यात आलेले ना-हरकत प्रमाणपत्र रद्द करून सदर दारू दुकान कायमस्वरूपी हटविण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच सब्जी मार्केट परिसरातील चिल्लर व ठोक भाजी विक्रेत्यांना भेडसावणाऱ्या कायमस्वरूपी समस्यांवर तोडगा काढण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे.
याशिवाय भद्रावती शहरातील गवराळा, विजासन, हनुमान नगर, बंगाली कॅम्प, डोलारा, कुंभारबोडी, आंबेडकर वार्ड, शिवाजी नगर व सुमठाणा परिसरातील अतिक्रमित झोपडपट्टीवासीयांना कायमस्वरूपी पट्टे देण्याबाबतचा विषय सभेपुढे मांडण्याची मागणी करण्यात आली आहे.
जुने पोलीस स्टेशनलगत असलेले सुलभ शौचालय तातडीने दुरुस्त करून नागरिकांच्या वापरासाठी सुरू करण्यात यावे, तसेच वडाच्या झाडापासून गंगमवार किराणा दुकानापर्यंत आणि पारेलवार दूध डेअरी ते हनुमान नगरपर्यंत रस्त्यांचे काँक्रिटीकरण करून दोन्ही बाजूंनी पेव्हर ब्लॉक बसविण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
वरील सर्व विषय हे भद्रावती शहरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित व जिव्हाळ्याचे असल्याने, येणाऱ्या सर्वसाधारण सभेत त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. निवेदन देताना माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक ॲड.सुनील नामोजवार काँग्रेसच्या गटनेच्या सरीता सूर, नगरसेवक सुनील पडोळे, उरवीला साव. उषा जाधव, जयश्री दुर्योधन, कल्पना भुसारी,रंजना गिरडकर, सीमा पवार व प्रथम मॅडम उपस्थित होते.



