ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते दादाजी मोरे समर्पित जीवन पुरस्काराने सन्मानित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समितीच्या वतीने दिला जाणारा दिवं. राजेश्वरजी बोढेकर स्मृती समर्पित जीवन पुरस्कार गांधी विनोबांच्या विचारांचे प्रचारक 85 वर्षीय ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते दादाजी रामचंद्र मोरे यांना लक्ष्मीनगर वडगाव येथे आयोजित एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नशामुक्ती भारत अभियान शासकीय समिती सदस्य श्रीधर मालेकर होते. तर ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, बामणी सायकल स्नेही मंडळाचे अध्यक्ष विनायक साळवे, धम्ममित्र नामदेव गेडकर, डॉ. धर्मा गावंडे, नगरसेवक सौ. मनिषा बोबडे , सौ. सविता मोरे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविकात प्रा. नामदेव मोरे यांनी दादाजी मोरे यांचा जीवनप्रवास उलगडला. तर बंडोपंत बोढेकर यांनी आपल्या भाषणात दादाजी मोरे यांनी आपल्या आयुष्यात स्विकारलेले विनोबांच्या विचारांचे व्रत आणि त्या विचारांनुरूप केलेली कृती, दिलेले समर्पण प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले. यावेळी अध्यक्षीय भाषणात श्रीधर मालेकर यांनी प्रत्यक्षात जीवन शिक्षण आचरण करणाऱ्या व्यक्तींची योग्य निवड केल्याबद्दल निवड समितीचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. श्रावण बानासुरे तर आभारप्रदर्शन नामदेव गेडकर यांनी केले.



