अंतोरा येथे समाधान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा :_ ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांच्या महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी तसेच जनतेच्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्याच्या उद्देशाने महसूल विभागाच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ आष्टी तालुक्यातील अंतोरा येथे आयोजित करण्यात आले. या शिबिरास नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
आष्टीच्या तहसीलदार ऐश्वर्या गिरी यांच्या अध्यक्षतेखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लहान आर्वीचे सरपंच सुनील साबळे आदी उपस्थित होते.
या शिबिरात नागरिकांना विविध प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. यामध्ये रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, भूमिहीन दाखले, उत्पन्न दाखले, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र, नॉन क्रीमीलेयर प्रमाणपत्र, केंद्रीय जात प्रमाणपत्र, घरकुल मंजूर प्रमाणपत्र, ई-राशन कार्ड तसेच संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. तसेच कलम 155 अंतर्गत आदेश, कलम 85 अंतर्गत आपसी वाटणीचे आदेश व कलम 143 नुसार रस्त्याचे आदेश अशा विविध प्रकारचे आदेशही देण्यात आले. यावेळी तहसीलदार ऐश्वर्या गिरी यांनी उपस्थित नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.
या शिबिरात एकूण 105 लाभार्थ्यांना विविध सेवा देण्यात आल्या. तसेच अभियान कालावधी सुरू झाल्यापासून 18 फेब्रुवारी ते 14 मार्च पर्यंत महाऑनलाइन पोर्टलवरून 906 विविध सेवा व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे.



