ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकऱ्यांनी एआय तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा – पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

महाविस्तार एआय ॲपच्या नोंदणी मोहिमेत वर्धा जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

कॉटन परिषद आयोजित करणार ; प्रगतीशिल शेतकऱ्यांचा सत्कार

वर्धा : शेतकऱ्यांचे जीवनमान अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी कृषी क्षेत्रात सातत्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ व आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती देऊन शेती अधिक उत्पादनक्षम कशी करता येईल, यासाठी शासन प्रयत्नशिल आहे. उत्पादन वाढविण्याबरोबरच उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी शेतकऱ्यांनी एआय तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.

जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी व कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने सेलसुरा येथे अन्न व षोषण सुरक्षा अभियानांतर्गत आयोजित जिल्हास्तरीय कृषि व स्ट्राबेरी महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्याहस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापिठाचे संचालक डॉ.धनराज उंदीरवाडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.जीवन कतोरे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अरविंद उपरीकर, उपविभागीय कृषि अधिकारी वैष्णवी शिंदे, उपसंचालक राणी गायकवाड, मिलिंद भेंडे, निलेश पोहेकर आदी उपस्थित होते.

कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा येथे शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यक्रम नियमितपणे आयोजित करता यावेत, यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून स्वतंत्र शेतकरी सभागृह उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. जिल्ह्यातील स्ट्रॉबेरी, टोमॅटो आणि इतर भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी कृषी विभागाने एक स्वतंत्र मंच स्थापन करून शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेची माहिती द्यावी, अशा सूचना पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी दिल्या.

महाराष्ट्र शासनाने सन 2026 हे वर्ष महिला शेतकरी वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रगतिशील महिला शेतकरी व कृषी सखी यांच्यासाठी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे अभ्यास दौरा व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केल्यास त्याचा अधिक फायदा होईल. विदर्भ हा कापूस पट्टा म्हणून ओळखला जात असल्याने कापूस उत्पादन वाढविण्यासाठी आणि शेतकऱ्यांना अधिक मार्गदर्शन मिळावे, यासाठी लवकरच सेवाग्राम येथे “कॉटन परिषद” आयोजित करण्याबाबत नियोजन सुरू असल्याचे पालकमंत्री डॉ.भोयर यांनी सांगितले.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या कृषी ॲपच्या नोंदणी मोहिमेत जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आल्याबद्दल जिल्ह्यातील शेतकरी व कृषी विभागाचे कौतुक पालकमंत्र्यांनी यावेळी केले. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध कृषि वाण, यांत्रिकी साहित्य उपलब्ध करुन दिले. शेतीला पुरक जोडधंदा, फळबाग, भाजीपाला आदी नगदी पिकांकडे शेतकऱ्यांनी वळले पाहिजे, असे डॉ.धनराज उंदीरवाडे म्हणाले.

मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण म्हणाले की, जिल्हास्तरीय कृषि व स्ट्राबेरी महोत्सवातील चर्चासत्रे, प्रगतशिल शेतकऱ्यांचे अनुभव, प्रयोगांचा वापर शेतामध्ये करुन घ्यावा. या कार्यक्रमातून नवीन काहीतरी शिकून आर्थिक प्रगती कशी साधता येईल यासाठी प्रयत्न करावा, असे त्यांनी सांगितले.

सुरुवातीला पालकमंत्र्यांनी गौशाळा, रोपवाटिका, नैसर्गिक पध्दतीने तयार करण्यात येणाऱ्या जैविक किटकनाशक प्रयोगशाळेची पाहणी केली. जिल्ह्यातील प्रयोगशिल शेतकरी, कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास जिल्ह्यातील शेतकरी, कृषि विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये