आलापल्ली _ चंद्रपूर महामार्गावरील ट्रॅव्हल्स धारकांची मनमानी
वाहतूक पोलिस विभागाचे दुर्लक्ष ; शासकीय बससेवेचा तुटवडा
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
चंद्रपूर_गडचिरोली जिल्हा जोडणाऱ्या चंद्रपूर_आलापल्ली महामार्गावर एस. टी. महामंडळाच्या बसेसचा तुटवडा असल्याने खाजगी ट्रॅव्हल्स मनमानी सुरू असून याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होतांना दिसून येत आहे. शहराप्रमाणेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही अवैध प्रवासी वाहतुकीने कहर केला असून शहरात किमान काही प्रमाणात अशा वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसत असले तरी ग्रामीण भागात वाहतूक पोलिसांचे अस्तित्वच कुठे दिसत नाही. काही ठिकाणी तर वाहतूक पोलीस आणि नियमबाह्य खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांचे संबंध इतके मधूर आहेत की, जणूकाही वाहतूक पोलिसांकडून खासगी वाहतूकदारांना कोणताही धोका कधीच होऊ शकणार नाही. त्यामुळे ट्रॅव्हल्स धारकांचे चांगलेच फावले असून याचा त्रास ग्रामीण प्रवाशांना सोसावा लागत आहे. या मार्गावर चालणाऱ्या ट्रॅव्हल्समध्ये प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी असल्याने अशा प्रकारच्या वाहनांना कधी एखादा अपघात झाल्यास प्रवाशांच्या जीवाला नाहक धोका निर्माण होऊ शकतो. काही प्रमाणात अपघात घडला तरी वाहतूक पोलिसांकडून काही दिवस कारवाईचे नाटक केले जाते. नंतर परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ होते.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात राज्य परिवहन मंडळाकडून होत असलेल्या वाहतूक सेवेत योग्य नियोजन नसल्याचा फायदा खासगी प्रवासी वाहतूकदारांना होत आहे. प्रवाशांच्या सोईनुसार बसची सेवा नसणे, कधी तीन ते चार तास एकही बस नसणे आणि कधी एकाच तासात तीन-चार बस असणे, असे प्रकार ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाहावयास मिळतात. या गैरसोयींना वैतागलेले प्रवासी सरळ खासगी वाहतुकीकडे आपला मोर्चा वळवितात. ग्रामीण भागातील जवळपास बहुतेक बस स्थानकांना खासगी प्रवासी वाहतुकदारांचा गराडा पडलेला राहात असल्याने या वाहतुकदारांचे दलाल बस स्थानकातून प्रवासी पळविण्याचेही काम करतात. हे वाहतूकदार लहान मुलांचे कोणतेही भाडे घेत नाहीत, शिवाय प्रवासी सांगतील त्या ठिकाणी वाहन उभे करण्यात येते. या फायद्याच्या गोष्टींमुळेही बसऐवजी प्रवाशांकडून ट्रॅव्हल्स, टॅक्सी सेवेला प्राधान्य दिले जाते. अर्थात प्रवाशांच्या दृष्टीने या जमेच्या बाजू असल्या तरी खासगी प्रवासी वाहतूक ही तितकीच धोकादायक आहे. बस चालकावर जबाबदारीचे ओझे असल्याने सुरक्षितपणे बस चालविण्यास प्राधान्य दिले जाते. याउलट खाजगी प्रवासी ट्रॅव्हल्सधारकांना दिवसातून अधिकाधिक फेऱ्या मारून कमाई करावयाची असल्याने त्यांच्याकडून वाहन चालविताना सुरक्षिततेऐवजी वेगाला अधिक प्राधान्य दिले जाते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक असते.
या खाजगी वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा प्रवासी अक्षरशः कोंबून भरलेले असतात. सध्या लग्नसराई सुरू असल्याने ट्रॅव्हल वाहतूकदारांची चांदीच चांदी होत आहे. ही धोकादायक वाहतूक पोलिसांच्या देखत होत असतानाही त्यांच्याविरुद्ध कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही. वाहतूक पोलिसांना ठराविक हप्ता दिल्यावर कारवाईपासून मुक्तता होत असल्याची चर्चा आहे. नियमित हप्ता थकल्यावर मात्र पोलिसांकडून कारवाई होते. बऱ्याच वेळा ट्रॅव्हल्सची तपासणी होणार असल्याचे चालकांना आधीच कळलेले असते. प्रवासी वाहतूक करणाऱ्या या ट्रॅव्हलचा अपघात झाल्यास या विषयाचा गवगवा होत असल्याने वाहतूक पोलिसांना कारवाईचा फार्स करणे भाग पडते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियमितपणे ग्रामीण भागात तपासणी मोहीम सुरू केल्यास अशा प्रकारच्या वाहतुकीस आळा बसू शकेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे
*सूरजागड खाण वाहतुकीचा अडथळा*
गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या सुरजागड लोह प्रकल्प आणि कोणसरी प्रकल्पातून दररोज हजारोंनी अवजड वाहने या महामार्गावरून धावतात. ज्यामुळे सदर मार्गाची पुरती वाट लागली आहे. याच कारणामुळे अनेक एस. टी. महामंडळाच्या आगारांनी अहेरी, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा या ठिकाणी जाणाऱ्या बसफेऱ्या बंद केल्या आहेत. याचाच फायदा घेत खाजगी ट्रॅव्हल्सधारकांनि आपले जाळे पसरविले असून आपल्याच मनमर्जीने वाहतूक सुरू आहे
*बसफेऱ्या बंद, प्रवाशांची दैना*
तालुक्यातील तेलंगणा मार्गाला जोडणाऱ्या गोंडपिपरी शहरातील रस्त्याचे काम सुरू असल्याने धाबा, पोडसा, सोनापूर, किरमिरी या मार्गावरील बसफेऱ्या बंद करण्यात आल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची एकच तारांबळ उडाली.
कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक बसेस न आल्यामुळे सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली, ज्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले. सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने कमीत कमी या कालावधीत बसफेऱ्या बंद न करता सुरू कराव्यात, अशी परिसरातील जनतेकडून मागणी होत आहे.



