घुग्घुसमध्ये महावितरणची मनमानी उघड: नोटीसशिवाय वीज कनेक्शन तोडल्याचा गंभीर आरोप

चांदा ब्लास्ट
घुग्घुस :_ महावितरणच्या घुग्घुस वीज वितरण केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून विद्युत ग्राहकांवर सर्रास अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. विद्युत अधिनियम 2003 मधील कलम 56 नुसार किमान 15 दिवसांची लेखी पूर्वसूचना देणे बंधनकारक असताना, कोणतीही नोटीस न देता थेट वीज कनेक्शन तोडले जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या बेकायदेशीर व मनमानी कारवाईमुळे सामान्य ग्राहकांना मानसिक त्रास, आर्थिक नुकसान तसेच सामाजिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही बाब केवळ ग्राहक हक्कांचे उल्लंघन नसून शासकीय अधिकारांचा गैरवापर असल्याचेही बोलले जात आहे.
या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते प्रणयकुमार बंडी यांनी जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्याकडे सविस्तर लेखी निवेदन सादर करत कठोर कारवाईची मागणी केली आहे. संबंधित सहायक अभियंता व कर्मचाऱ्यांविरोधात तात्काळ विभागीय चौकशी, दोषींवर कडक शिक्षा, तसेच भविष्यात नोटीसशिवाय वीजपुरवठा खंडित न करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात यावेत, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
वेळीच न्याय न मिळाल्यास पोलीस विभाग, विद्युत लोकपाल, ग्राहक न्यायालय तसेच माननीय न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची प्रत मुख्यमंत्री, ऊर्जा मंत्री, महावितरणचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधीक्षक व नगर परिषद प्रशासनाला देण्यात आली आहे.
महावितरण प्रशासन या गंभीर आरोपांची दखल घेऊन ग्राहकांना दिलासा देणार का, की नागरिकांचा रोष आणखी तीव्र होणार, याकडे संपूर्ण घुग्घुस शहराचे लक्ष लागले आहे.



