“अनकन्फर्म” सुविधेमुळे आरटीई प्रवेश प्रक्रिया सुलभ
१ किमीची अट रद्द, २५ मार्चपर्यंत मुदतवाढ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
शिक्षण हक्क कायदा (आरटीई) प्रवेश प्रक्रियेत यंदाच्या वर्षी नव्याने घालण्यात आलेली घरापासून १ किलोमीटर अंतरातील शाळा निवडण्याची अट अखेर रद्द करण्यात आली असून आता पालकांना घरापासून ३ ते ५ किमी अंतरातील शाळा निवडता येणार आहे. ज्या पालकांनी अर्ज भरले आहेत त्यांच्यासाठी अधिकृत संकेतस्थळावरुन अर्ज दुरुस्त करता येणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची मुदत २५ मार्च पर्यंत वाढविण्यात आली आहे.
शिक्षण हक्क कायदा (आरटीई) प्रवेश प्रक्रियेला १७ फेब्रुवारी पासून सुरुवात झाली. आरटीई कायद्यात यंदाच्या वर्षी ३ किमी ऐवजी १ किमी अंतराच्या आतील शाळा निवडाव्या अशी नवीन नियमावली घालण्यात आली होती. या नव्या नियमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आरटीई प्रक्रियेपासून वंचित राहावे लागत होते. तर, शहरी भागातील विद्यार्थ्यांनाही शाळा निवडताना अडचन निर्माण होत होती. त्यामुळे या नव्या नियमावलीचा सर्वच स्तरातून विरोध होत होता. अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार शाळेच्या अंतरासंबंधीची १ किलोमीटरची अट शिथिल करण्यात आली. आता, पालकांना घरापासून ३ किमी ते ५ किमी पर्यंत अंतरातील शाळा निवडता येणार असून यामुळे पालकांना शाळांचे अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत.
यापूर्वी ज्या पालकांनी अर्ज भरले आहेत त्यांना आरटीईच्या अधिकृत संकेतस्थळावर दुरुस्ती करण्यासाठी पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. अर्जातील दुरुस्तीसाठी तसेच १ किमी अंतरामुळे जे विद्यार्थी आरटीईपासून वंचित राहिले त्यांना आता २५ मार्च पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे, याची पालकांनी नोंद घ्यावी आणि पाल्याच्या अर्जात शाळा निवडीचे अवश्य ते बदल करावे असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
*”अनकन्फर्म” सुविधा उपलब्ध*
प्रवेशासाठी अर्ज भरण्यासाठी असलेली १ किलोमीटरची अट रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या पालकांनी १ किलोमीटरच्या आत असलेल्या शाळांची निवड करून फॉर्म सबमिट केला आहे, तसेच ज्या पालकांनी/विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे, त्यांना आता प्रवेशासाठी १किमी, १ ते ३ किमी तसेच ३ किमीपेक्षा अधिक अंतरावरील शाळा उपलब्ध झाल्या आहेत.
या अनुषंगाने संबंधित पालकांना पालक लॉगिनमध्ये “अनकन्फर्म” करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी संबंधित सर्व पालकांनी आपला सादर केलेला अर्ज “अनकन्फर्म” करून या मुदतवाढीचा लाभ घेऊन अर्जामध्ये आवश्यक दुरुस्ती अथवा नवीन अर्ज सादर करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी. यासंदर्भात क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी व शाळांनी ही माहिती जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.



