शास.औ. प्र.संस्थेत शिवराज्याभिषेक कार्यक्रम संपन्न
जलसंवर्धनाच्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांनी अवलंबलेली जलनीती प्रेरणादायी - प्रा.डॉ. योगेश दुधपचारे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
चंद्रपूर :_ छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारताना जलसंपत्तीचे महत्त्व ओळखून अत्यंत दूरदर्शी जलनीती अवलंबली. त्यांच्या जलनीतीचा मुख्य उद्देश प्रजेची पिण्याच्या पाण्याची गरज भागवणे, शेतीला पाणी उपलब्ध करून देणे, किल्ल्यांवरील पाण्याचा साठा कायम राखणे आणि जलमार्गांद्वारे व्यापार व संरक्षण मजबूत करणे हा होता. आजच्या काळात पर्यावरण संरक्षणाचा विचार करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अभ्यास करायला हवा, असे प्रतिपादन प्रा. डॉ. योगेश दुधपचारे यांनी केले.
ऋषी अगस्त्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शिवराज्याभिषेक कार्यक्रमाचे आयोजन रासेयो सभागृहात करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य गजानन राजुरकर होते. यावेळी रासेयो सल्लागार तथा गटनिदेशक बंडोपंत बोढेकर, गटनिदेशक हितेश नंदेश्वर, कार्यक्रम अधिकारी गटनिदेशक राजू श्रीरामे, सह कार्यक्रम अधिकारी सौ. अनिता ढेंगेकर आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बंडोपंत बोढेकर यांनी केले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रासंगिकता यावर भाष्य केले. प्राचार्य गजानन राजुरकर म्हणाले की, नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन,
नैसर्गिक साधनसंपत्तीचा विवेकपूर्ण वापर करण्याची आपण प्रत्येकांनी पर्यावरणाच्या दृष्टीने भूमिका घेतली पाहिजे, असे ते म्हणाले.
अतिथींचा परिचय सौ. ढेंगेकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन निदेशक पियुष केने यांनी केले तर आभार प्रदर्शन राजू श्रीरामे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, आयोजन समितीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.



