भद्रावती येथे २९ मार्चला विदर्भस्तरीय ‘स्मृतिगंध’ काव्यसंमेलन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
स्व. विणा आडेकर स्मृती प्रतिष्ठान, भद्रावती यांच्या वतीने रविवार दि. २९ मार्च २०२६ रोजी विदर्भस्तरीय नववे ‘स्मृतिगंध’ काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे काव्यसंमेलन भद्रावती येथील श्री. मुरलीधर पाटील गुंडावार सभागृहात पार पडणार असून साहित्यिक, कवी व रसिकांसाठी हा काव्यसोहळा खुला आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.३० वाजता स्व. आचार्य ना. गो. थुटे स्मृतीमंचावर उद्घाटन समारंभाने होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी व प्रख्यात रेखाचित्रकार प्रमोदकुमार अनेराव (भंडारा) राहणार आहेत. नगराध्यक्ष प्रफूल चटकी हे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अजय देशपांडे, डॉ. किशोर कवठे, डॉ. प्रकाश महाकाळकर, प्रा. पुनीत मातकर, डॉ. प्रकाश वटी व सामाजिक कार्यकर्ते विशाल गावंडे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विजय गायकवाड करणार आहेत.
दुपारी १२.३० वाजता ‘स्मृतिगंध निमंत्रितांचे कविसंमेलन’ होणार असून या सत्रात डॉ. किशोर कवठे, प्रा. पुनीत मातकर, इरफान शेख, अविनाश पोईनकर आणि गजानन माद्यसवार यांची उपस्थिती राहणार आहे. या सत्राचे सूत्रसंचालन राजेश माहूरकर (नागपूर) करणार आहेत.
दुपारी २.३० वाजता ‘स्मृतिगंध गझल मैफिल’ या विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. प्रवीण तुराणकर, जयवंत वानखेडे, राम रोगे, मंगेश जनबंधू आणि दिलीप पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. मारोती आरेवार हे सूत्रसंचालन करणार असून गौतम राऊत, प्रशांत भंडारे, केशव कुकडे, अर्जुमन शेख, अपर्णा नैताम, विजय वासाडे, रमेश बुरबुरे, सत्तू भांडेकर, अर्चना जुनघरे, मीनाक्षी गोरंटीवार, शितल कर्नेवार, नरेंद्र गंधारे व सुनील पोटे आदी गझलकार सहभाग घेणार आहेत.
यानंतर ‘स्मृतिगंध कवितेच्या गावात’ या सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्राच्या अध्यक्षस्थानी भारती लखमापूरे राहणार असून दीपक शिव, सुभाष उसेवार, मंजुषा दरवरे, संगीता पिज्दुरकर, जयंत लेंझे आणि डॉ. ज्ञानेश हटवार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या सत्राचे सूत्रसंचालन गणेश पेंदोर करणार आहेत.
नवोदित कवींच्या काव्यप्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि साहित्याची परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हा ‘स्मृतिगंध’ काव्यसंमेलनाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. या काव्यसंमेलनाला साहित्यप्रेमी, कवी आणि रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्व. विणा आडेकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.


