ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बहिणाबाई विद्यालयात ईव्हीएमद्वारे शालेय मंत्रिमंडळाची स्थापना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- जिवतीपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावरील बहिणाबाई विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) द्वारे शालेय मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली. विद्यार्थ्यांना लोकशाही निवडणूक प्रक्रिया आणि ईव्हीएमद्वारे मतदानाचे प्रत्यक्ष ज्ञान मिळावे, या उद्देशाने हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी शाळेत प्रत्यक्ष मतदान केंद्राप्रमाणे व्यवस्था करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना ईव्हीएमच्या साहाय्याने मतदान कसे करावे, मतदानाची गोपनीयता कशी राखली जाते तसेच निवडणूक प्रक्रियेत मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी आणि बीएलओ यांची भूमिका काय असते, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मतदानाचा अनुभव देण्यासाठी ईव्हीएमवर मतदानाचे प्रात्यक्षिकही घेण्यात आले.

या निवडणूक प्रक्रियेत शाळेचे मुख्याध्यापक यू. एस. कराळे यांनी मतदान केंद्राध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली. मतदान अधिकारी म्हणून एस. बी. राठोड, एस. एल. तावाडे, एस. पी. निखाडे, एस. ई. इंद्राळे आणि पी. एस. पारखी यांनी काम पाहिले. तसेच सी. ए. काटकर आणि व्ही. डी. पेंदोर यांनी बीएलओ म्हणून आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.

उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व, लोकशाही व्यवस्थेत मतदाराची भूमिका, मतदान करताना घ्यावयाची काळजी आणि मतदानाची गोपनीयता का आवश्यक आहे, याविषयीही माहिती देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न राहता निवडणूक प्रक्रियेचे प्रत्यक्ष ज्ञान मिळाले.

‘ईव्हीएमद्वारे शालेय मतदान’ या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्ये, सामाजिक जबाबदारीची भावना आणि मतदानाबाबत जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. भविष्यात सुजाण, जबाबदार आणि लोकशाही मूल्यांचा आदर करणारे नागरिक घडविण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या प्रसंगी शिक्षक, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने मतदान प्रक्रियेत सहभाग घेत हा उपक्रम यशस्वी केला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये