शेतकरी हितासाठी निधीची कधीही कमतरता भासू देणार नाही; चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही
आ.मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ९५ लाखांच्या गाळे बांधकामाचे भूमिपूजन; चंद्रपूर बाजार समितीच्या विकासकामांना मिळणार नवी गती

कार्यक्रमाला आमदार देवराव भोंगळे, सभापती गंगाधर वैद्य, उपसभापती सुनील फरकाडे, संचालक अलकाताई वाढई, सुभाष पिंपळशेंडे, अजय बल्की, अनिल मोरे, सुरेश कुसराम, प्रकाश खडके, चंद्रकांत गुरू, दयानंद बंकुवाले, प्रभाकर सिडाम, किशोरी मत्ते, प्रतिष्ठित व्यापारी रामकिशोर सारडा, संतोष चिल्लरवार यांच्यासह शेतकरी, व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, भूमिपूजनासाठी निमंत्रण दिल्याबद्दल मी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो. आज ९५ लाख रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या गाळे बांधकामाचे अधिकृत भूमिपूजन सर्वांच्या साक्षीने होत असून, हा बाजार समितीच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा आहे. चंद्रपूरची कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यातील आदर्श बाजार समित्यांपैकी एक व्हावी, आधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि शेतकरी व व्यापाऱ्यांना अधिक सक्षम सेवा मिळावी, या दृष्टीने संचालक मंडळ सातत्याने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाच्या कार्याचे कौतुक केले. शेतकरी व व्यापारी हिताला केंद्रस्थानी ठेवून विविध विकासकामे आणि लोकाभिमुख योजना प्रभावीपणे राबवत बाजार समितीला अधिक सक्षम, आधुनिक आणि प्रगत करण्यासाठी संचालक मंडळ सातत्याने प्रयत्नशील असल्याबद्दल त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी बाजार परिसरालगत नाल्याचे बांधकाम करण्यात यावे, जेणेकरून पावसाचे पाणी शेतात शिरून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होणार नाही, असा प्रस्ताव आपल्यासमोर मांडण्यात आल्याचे आ. मुनगंटीवार यांनी सांगितले. हा अत्यंत महत्त्वाचा व शेतकरीहिताचा विषय असून संबंधित नाल्याची तातडीने पाहणी करून त्याचा सविस्तर अंदाजपत्रक तयार करण्यात येईल. त्यानंतर या कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे यावेळी त्यांनी नमूद केले.
या कामामुळे पावसाच्या पाण्यामुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान टळेल, त्यांच्या कष्टाचे पीक सुरक्षित राहील आणि त्यांच्या परिश्रमावर पाणी फिरणार नाही. शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक असलेले प्रत्येक काम प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
आमदार मुनगंटीवार पुढे म्हणाले की, राज्य शासनाकडून कोणतेही थेट आर्थिक अनुदान मिळत नसतानाही १९६० मध्ये स्थापन झालेली आणि १९६८ पासून कार्यरत असलेली चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती आजही शेतकऱ्यांचा विश्वास कायम राखून कार्यरत आहे. ही बाजार समिती शेतकऱ्यांसाठी केवळ बाजारपेठ नसून त्यांच्या हक्काची, विश्वासाची आणि संकटसमयी धावून जाणारी एक सक्षम व्यवस्था आहे. त्यामुळे तिचा विकास म्हणजे थेट शेतकऱ्यांच्या विकासाला बळ देणारे पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले.
चंद्रपूर प्रत्येक क्षेत्रात राज्यात अग्रस्थानी राहावे, कृषी उत्पन्न बाजार समितीनेही आपल्या कार्यक्षमतेची वेगळी ओळख निर्माण करावी आणि शेतकरी, व्यापारी व ग्राहक यांच्या हिताचे केंद्र म्हणून अधिक सक्षम व्हावे, यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.


