ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रघुवंशी कॉम्प्लेक्स : तब्बल ३० तासांहून अधिक अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण

रघुवंशी कॉम्प्लेक्समधील २२ आस्थापनाधारकांना मनपातर्फे नोटिसा

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ शहरातील रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे रात्रीच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीवर चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या विविध विभागांनी तब्बल ३० तासांहून अधिक काळ अथक प्रयत्न करून नियंत्रण मिळविले. सुमारे ५० दुकानांचा संपूर्ण कॉम्प्लेक्स आगीच्या धोक्यात असताना आग केवळ एका दुकानापुरती मर्यादित ठेवण्यात यश आले.

या बचावकार्यात अग्निशमन विभागातील सुमारे ३० अधिकारी-कर्मचाऱ्यांनी धाडसाने व सातत्याने कार्य केले. श्री. राहुल पंचबुद्धे व श्री. चिवंडे यांनी जोखमीच्या परिस्थितीत प्रत्यक्ष घटनास्थळी उल्लेखनीय कामगिरी बजावली. अतिक्रमण विभागाचे मनीष शुक्ला व त्यांच्या पथकाने घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सातत्याने कार्य केले. यांत्रिकी विभागाचे चेतन्य चौरे यांनी अग्निशमन वाहनांसाठी पाण्याचा अखंड पुरवठा सुनिश्चित केला. विद्युत विभागाच्या प्रगती भुरे यांनी रात्रीच्या बचावकार्यासाठी हॅलोजन लाईट्सची व्यवस्था केली. आग आटोक्यात आल्यानंतर स्वच्छता विभागाचे गर्गेलवार व त्यांच्या पथकाने जळालेला कचरा व साहित्य तातडीने हटविले.

भंडारपाल विभागातील अहेमद सिद्धिकी यांनी बचावकार्यात सहभागी अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी भोजन, नाश्ता व आवश्यक व्यवस्था उपलब्ध करून दिली. तसेच DDMO श्री. सलीम शेख यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष उपस्थित राहून बचावकार्याला सक्रिय सहकार्य केले.

दरम्यान, आग नियंत्रणात आल्यानंतर रघुवंशी कॉम्प्लेक्समधील २२ आस्थापनाधारकांना मनपातर्फे नोटिसा बजावण्यात आल्या असून, नियमानुसार पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. तसेच आगीच्या घटनेप्रकरणी संबंधित मेसर्स इंडियन मेडिकल एजन्सी यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येत असून, नियमानुसार दंडात्मक कारवाईदेखील करण्यात येत आहे. संबंधित प्रकरणात आवश्यक ती सर्व कायदेशीर व प्रशासकीय कार्यवाही नियमानुसार करण्यात येत आहे.

मा. आयुक्त श्री. अकुनूरी नरेश यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागप्रमुख व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी समन्वयाने एकत्रितपणे काम करत मोठी दुर्घटना टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये