ताज्या घडामोडी

देऊळगाव राजा पोलिसांची धडक कारवाई; १.६२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांविरुद्ध गुन्हा 

सिनगाव जहाँगीर येथे अवैध देशी दारूचा साठा उधळला; कारसह दारू जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा : गुप्त माहितीच्या आधारे देऊळगाव राजा पोलिसांनी सिनगाव जहाँगीर येथे टाकलेल्या धाडीत अवैधरीत्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्या तिघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत देशी दारूचा साठा व चारचाकी वाहनासह एकूण १ लाख ६२ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास सिनगाव जहाँगीर येथे अवैध देशी दारूचा साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर पंचांसमक्ष छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान आरोपींच्या ताब्यातून ‘सखू संत्रा’ कंपनीच्या १८० मिली क्षमतेच्या देशी दारूच्या १४४ बाटल्या (तीन बॉक्स) आढळून आल्या. प्रत्येकी ९० रुपये किमतीच्या या बाटल्यांची एकूण किंमत १२ हजार ९६० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याशिवाय, दारू वाहतुकीसाठी वापरण्यात येत असलेली लाल रंगाची सेंट्रो कार (क्र. एमएच-१५-सीडी-२७२१), अंदाजे १ लाख ५० हजार रुपये किमतीची, जप्त करण्यात आली. अशा प्रकारे पोलिसांनी एकूण १ लाख ६२ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

या प्रकरणी एकनाथ सुखदेव लोंढे (वय ३५, रा. भिवगाव, ता. देऊळगाव राजा), निलेश एकनाथ शिवनकर (वय ३५, रा. सिनगाव जहाँगीर) आणि ज्ञानेश्वर खरात (रा. वाघुळ, ता. जि. जालना) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कलम ६५ (अ) व ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल माधव नारायण कुटे (बकल क्रमांक १२०२), पोलीस ठाणे देऊळगाव राजा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला. वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढील तपास पोहेकॉ. माधव नारायण कुटे हे करीत आहेत.

देऊळगाव राजा पोलिसांनी अवैध मद्यविक्री व वाहतुकीविरोधातील कारवाया आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत दिले असून, नागरिकांनी अशा प्रकारची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे..

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये