कॅन्सरग्रस्त शामसुंदर राऊत यांना सहकारी बँकेकडून मदतीचा हात
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी कल्याण निधीतून ४० हजारांचा धनादेश वितरीत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूरच्या वतीने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी कल्याण निधी योजनेअंतर्गत सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत कॅन्सरग्रस्त रुग्णास आर्थिक मदत प्रदान करण्यात आली. कोरपना तालुक्यातील नांदा येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, पंचायत समिती कोरपना येथील माजी उपसभापती तसेच नांदा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शामसुंदर राऊत यांना उपचारासाठी ४० हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २५ फेब्रुवारी रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत माजी आमदार निमकर व संचालक विजयराव बावणे यांनी केलेल्या प्रयत्नामुळे राऊत यांच्या उपचारासाठी बँकेचे कार्यतत्पर अध्यक्ष रवींद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेत तातडीने आर्थिक मदत मंजूर करण्यात आली. त्या निर्णयाच्या अंमलबजावणीचा भाग म्हणून १० मार्च रोजी हा धनादेश बँकेच्या विभागीय समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार सुदर्शन निमकर आणि बँकेचे संचालक विजयराव बावणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी बँकेचे विभागीय अधिकारी बी. एल. जोगी, संबंधित शाखेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाला नांदा ग्रामपंचायतीचे उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले, अल्ट्राटेक सिमेंट युनियनचे महासचिव शिवचंद्र काळे, कृषी उत्पन्न बाजार समिती राजूरा चे उपसभापती संजय पावडे, तसेच पुरुषोत्तम निब्रड, उत्तम काळे, नितीन बांब्रटकर, रवी बंडिवार, लहुजी गोंडे, धनराज शेखावत, गणेश लोंढे आणि गणेश गादगोनिवार यांच्यासह परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
दरम्यान, मदत धनादेश प्रदान करण्यात आलेल्या दिवशीच योगायोगाने शामसुंदर राऊत यांचा वाढदिवस असल्याने उपस्थित मान्यवरांनी त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याप्रसंगी गंभीर आजाराशी लढा देत असलेल्या राऊत यांच्या आरोग्यासाठी सर्वांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. श्यामसुंदर राऊत यांनी सरपंच व उपसभापती असताना केलेल्या अत्यंत प्रामाणिक व लोकाभिमुख कार्यामुळे ते लोकप्रिय ठरले होते.
सामान्य परिस्थितीतून राजकीय व सामाजिक क्षेत्रात दीर्घकाळ कार्य केलेल्या व्यक्तीला पक्षभेद विसरून संकटकाळात सहकारी बँकेकडून मिळालेली आर्थिक मदत ही केवळ आर्थिक सहाय्य नसून सामाजिक संवेदनशीलतेचे प्रतीक व त्यांच्या निस्वार्थ सेवेचा सन्मान विद्यमान लोकप्रतिनिधी कडून केल्याची भावना नांदा व परिसरातून व्यक्त करण्यात येत आहे.


